जळगाव : भाजपचे माजी मंत्री तथा माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे लवकरच पक्षबदल करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लवकरच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला विराम मिळण्याचे देखील बोलले जात आहे.
या तयारीचा भाग म्हणून काही कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीला लागले असल्याचे देखील बोलले जात आहे. असे असले तरी मिडीयाच माझ्या पक्षबदलाचा मुहूर्त ठरवत असल्याचे सांगून खडसे या बदलाचे गुढ अजूनही कायम ठेवण्यात यश मिळवत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात खडसे यांचा पक्षबदलाचा सस्पेंस कायम असला तरी आतील गोटातील मोठ्या प्रमाणावर होणा-या हालचाली प्रत्यक्ष पडद्यावर अजुन दिसून येत नसल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष पडद्यावरील राजकीय चित्रपट लवकरच झळकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
गुरुवारी हा मुहुर्त लागण्याची चिन्हे आता वर्तवली जात आहे. जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील चौघा हत्याकांडाच्या कुटूंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी एकनाथराव खडसे व गृहमंत्री अनिल देशमुख हे एकाच वाहनातून सोबतीने गेले होते. दोघांमधे झालेल्या चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी पक्षबदलाची गुफ्तगू नक्कीच झाली असल्याचे म्हटले जात आहे.