जागतिक पातळीवर “फुटबॉल” खेळाचे कोट्यावधी चाहते आहेत असे म्हणतात. दोन टीम हा फुटबॉल जोरकसपणे लाथाडून प्रतिस्पर्ध्यावर मात करतात. कुणी जिंकतो तर कुणी हरतो. आमच्या खानदेशात भाजपचे वजनदार राजकीय नेते एकनाथराव खडसे यांच्या राजकीय पक्षांतराचा सध्या असाचा काहीसा फुटबॉल झाल्याचे दिसते.
गेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने तिकीट नाकारुन नाथाभाऊंना घरीच बसवण्याचे डावपेच खेळले. त्यांच्या सुकन्येला तिकीट देवून भाऊंच्या जखमेवर चांगलेच तिखट मिठ चोळल्याचे बोलले जाते. त्याही पुर्वी मंत्रीपदावरुन गच्छंती घडवून आणली. त्यांच्या मागे भोसरी जमीन खरेदी प्रकरणाचा भुंगा लावला.
प्रचंड बेनामी संपत्तीचे आरोप झाले. दमानीया यांनीही त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उडवली. या सर्व वादात संतापलेल्या नाथाभाऊंनी जाहीरपणे पुरावे मागीतले. अलीकडे तर त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांकरवी भाजपाला धडा शिकवण्याची घोषणा झाली.
आपले मंत्रीपद घालवणा-या भाजपतल्या मंत्र्याला जनतेसमोर खेचून आणू असेही भाऊंनी दणकावले होते. आपल्या अधोगतीस देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा जाहीर आरोप देखील त्यांनी केला. तेव्हा “आपण घरची धुणी अशी बाहेर रस्त्यावर धुत नसतो” अशा शब्दात फडणवीस यांनी देखील पलटवार केला होता. यानंतर भाजपात आता नाथाभाऊ यांना काहीच स्थान आणि भविष्य नसल्याचे दिसताच त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरु झाली.
बहुतेक राजकारण्यांसह जनतेला माहीती असलेला उपरोक्त मुद्द्यांचा आढावा घेण्याचे कारण असे की “नाथाभाऊ” यांनी योजनाबद्ध रित्या वृत्तपत्रे आणि न्युज चॅनल्स वरुन त्यांच्याकडील कथित अन्यायाची चर्चा गाजवली. भाजपात गृहीत धरु नका म्हणून बजावले. एवढेच नव्हे तर कधी काळचा वाण्या – ब्राम्हणांचा पक्ष असलेला भाजपा आपणच वाढवल्याची आठवण द्यायलाही ते विसरले नाही.
जिल्ह्यात दुस-या फळीतील कथीत नेत्यांना नाड्या बांधायला आपणच शिकवले असेही ते म्हणतात. नाथाभाऊंच्या या टीकेचा रोख जिल्ह्यातले भाजपाचे माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या गटाकडे इशारा करतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या राजकीय पक्षांतराची सोय करतांनाच शिवसेनेच्या बाणांचा मारा आपल्या दिशेने होवू नये म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच त्यांचे जाहीर अभिनंदन करतांनाची छायाचित्रे प्रसिद्धीस देण्याची व्यवस्था देखील अचूक राबवली गेली. हा भाजपाला सुचक इशारा होता. एवढे होवूनही भाजपाचे नेतृत्व त्यांच्या आदळ आपट कडे ढुंकुनही पहात नसल्याने राज्य भाजपात आपण संपलो या जाणीवेतून त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचा संदेश सोडण्यात मात्र ते यशस्वी झाले. त्यांची रा.कॉ.शी तशी सौदेबाजी असावी अशा अटकळी आहे.
नाथाभाऊ यांचे आता भाजपात काही खरे दिसत नाही आणि त्यांना सध्या रा.कॉ. शिवाय पर्याय नाही असे ओळखून जिल्ह्यातल्या त्यांच्या समर्थकांनी आताच रा.कॉ.त उद्याच्या पदांसाठी फिल्डींग लावून ठेवल्याचे बोलले जाते. ज्यांच्या पक्षांतराचा मुद्दा गाजतोय ते नाथाभाऊ मात्र आपण अद्याप भाजपा सोडला नसल्याचे म्हणतात. त्यांचि कन्या रोहीणी खडसे या देखील बाबांनी पक्ष सोडला नाही असे म्हणतात.
घटस्थापनेच्या दिवशीच कथित रित्या चर्चेला आलेल्या परंतु न झालेल्या त्यांच्या रा.कॉ. प्रवेशाचा मुहुर्त हुकल्याचे दिसले. त्यावर स्वत: नाथाभाऊंनीच या चर्चेचे खापर मिडीयावर फोडले. आपणास पक्षाबाहेर (भाजपा) ढकलले जात असल्याची हाकाटी त्यांनी सुरु केली आहे. नाथाभाऊंची ही खेळी म्हणजे “दांभीकपणा” असल्याचे भाजपाच्या गोटातुन बोलले जाते. नाथाभाऊंचा कथित पक्षांतराचा फुटबॉल चंद्रकांतदादा पाटील, अजितदादा पवार, खा.सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी परस्परांकडे टोलवला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी तर भाजपातले खडसे हे कॉग्रेसवासी होते याची आठवण करुन दिली. त्यांच्या सुनेसाठी हरीभाऊ जावळे यांचे तिकीट कापण्याची खेळी झाली.
त्यामुळे हरीभाऊंसारख्या चांगल्या नेत्याच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? असाही टोला चंद्रकांतदादांनी हाणला आहे. भाजपाने त्यांच्या मुलाला विधानसभेचे तिकीट दिले होते. आता कन्येस तिकीट दिले. त्यांची एक कन्या जिल्हा बॅंकेवर चेअरमन आणी पत्नी महानंद चेअरमन पदावर राहिल्या. त्यामुळे भाजपाने अन्यायच केल्याची त्यांची ओरड व्यर्थ आहे असेही भाजपा प्रदेशाध्यक्षांचे म्हणणे आहे. नाथाभाऊंनी आपल्याकडे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीमाना दिलेला नाही. त्यांची कन्यादेखील तेच म्हणते त्यामुळे नाथाभाऊंच्या पक्षांतराचा फुटबॉल भाजपा आणी रा.कॉ. सह शिवसेनादेखील परस्परांकडे टोलवतांना दिसते. त्यांच्या पक्षांतराचा मुद्दा गांभिर्याएवजी एक मजाक तर काही काळ करमणुकीचा विषय बनला नाही ना?
सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव)
8805667750