मुंबई : एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ऑफर देऊ शकतात असे एक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाबद्दल विचारले असता संजय राऊत यांनी सांगितले की पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या असून त्यांना पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.
सरकारला एक वर्ष पूर्ण होत असून काहींना वाटते की हे सरकार लवकरच कोसळेल. मात्र हे सरकार पूर्ण ताकदीनिशी चालले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लढाई उत्तम हाताळली असल्याचे राऊत म्हणाले.
शरद पवार सरकार चालवत असल्याचा आरोप चुकीचा आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून ते महाविकास आघाडी सरकारला मार्गदर्शन करत असतात. ते वरिष्ठ नेते असल्यामुळे सरकारला सल्ला देण्याचे काम करतात. याबद्दल चंद्रकांत पाटलांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही पवारांचे मार्गदर्शन घेत असावे असे देखील राऊत म्हणाले.