जळगाव : रखडलेली पोलिस भरती प्रक्रीया राज्यात लवकरच राबवली जाणार आहे. मंत्रिमंडळाकडून 12 हजार 528 पदांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत कार्यवाही सुरु असतांना मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्यामुळे भरती प्रक्रिया रखडली.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलिस अधिकारी – कर्मचारी वर्गाच्या निवासस्थानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. तत्पुर्वी पत्रकारांसमवेत त्यांनी संवाद साधला होता. त्यावेळी बोलतांना त्यांनी पोलिस भरती प्रक्रीयेची माहिती दिली.
यावेळी अधिक बोलतांना गृहमंत्री म्हणाले की मराठा आरक्षणाचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर निकाली काढण्याचे प्रयत्न सुरु असून कोणत्याही समाज घटकावर अन्याय होता कामा नये. त्यासाठी 13 % आरक्षणाचा मुद्दा सोडून लवकरात लवकर राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल.
विधान परिषदेवर बारा जणांची नेमणूक केली जाणार असून ती नावे तिघा पक्षाकडून ठरलेली आहेत. या नावासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीने सदर पत्र राज्यपालांना दिले जाईल. त्यानंतर राज्यपालांनी या बारा जणांच्या नावांना मंजुरी अपेक्षीत असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले. शेतक-यांच्या फसवणूकीला आळा बसण्यासाठी लवकरच कायदा आणला जाईल. आंध्र प्रदेशातील महिला अत्याचार विरोधी दिशा कायद्याप्रमाणे हा कायदा असेल असे अनिल देशमुख यांनी बोलतांना सांगीतले.