कोरोना संकट काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अन्य केंद्रीय मंत्र्यांनी जनतेला पी.एम.केअर मधे देणगी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सामान्य जनतेसह अनेक उद्योगपती, फिल्मी कलाकारांनी पी.एम. केअर फंडात देणगी दिली. जळगावचे माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी 13 मे रोजी माहितीच्या अधिकारात यासंबंधी सात प्रश्नांची माहिती मागीतली होती. सरकारी नियमांच्या अधिन राहून कॅग द्वारा या देणगीच्या रकमेचे ऑडीट होणार आहे अथवा नाही? यासह विविध माहितीची मागणी करण्यात आली होती. जन माहिती अधिका-यांनी दिपककुमार गुप्ता यांना कळवले की ही पब्लिक ऑथर्टी नाही. त्यामुळे याबाबत कुठलीही माहिती देता येत नाही.
कोविड 19 या महामारी पासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पीएम केअर फंडचे संचालक कोण कोण आहेत? आतापर्यंत 50 लाखाहून अधिक रकमेची देणगी देणा-या दात्यांची नावे काय? माहिती देण्याच्या तारखेपर्यंत किती रक्कम या खात्यात जमा झाली? प्रधानमंत्री आपदा राहत कोष असतांना कोविड 19 साठी पीएम केअर फंड तयार करण्याची आवश्यकता का भासली? पीएम केअर फंडाचे ऑडीट कॅग अंतर्गत येते का? अशा विविध प्रश्नांची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी मागीतली होती.
माहिती अधिकारात या प्रकारची माहिती देता येत नसल्याचे गुप्ता यांना कळवण्यात आले आहे.