लक्ष्मणच्या पत्नीसोबत जयसिंगचे लफडे ; कु-हाडीच्या घावात झाले त्याचे दोन तुकडे

आरोपी समवेत पोलिस पथक

सांगली: जयसिंग शामराव जमदाडे हा एक कसलेला शेतकरी अर्थात बळीराजा होता. सांगली जिल्हयाच्या कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात तो रहात होता. सधन शेतकरी परिवारातील जयसिंगकडे चांगल्या प्रतीची शेती होती. त्या शेतीतून त्याला चांगले उत्पन्न मिळत होते. त्यामुळे त्याच्या हातात व खिशात पैसा खुळखुळत होता. त्याला परस्त्रीचा नाद लागला होता.

जयसिंग जमदाडे (मयत)

तो रहात असलेल्या देवराष्ट्रे गावात त्याचा एक मित्र होता. लक्ष्मण निवृत्ती मुढे असे त्या मित्राचे नाव होते. मित्राच्या नात्याने लक्ष्मणच्या घरी जयसिंग नेहमी जात असे.त्यामुळे लक्ष्मणच्या पत्नीसोबत जयसिंगची चांगली ओळख झाली होती. त्या ओळखीतून दोघांची नजरानजर सुरु झाली. नजरेच्या खेळात दोघांना एकमेकांची सांकेतीक भाषा समजण्यास वेळ लागला नाही.

लक्ष्मणची पत्नी व जयसिंग यांचा चोरी चोरी चुपके चुपके नजरेचा खेळ प्राथमिक स्तरावरुन उच्च स्तरावर जाण्यास वेळ लागला नाही. लक्ष्मणची पत्नी दिसायला देखणी होती. तिच्या प्रेमळ वागण्याचा, बोलण्याचा व हळूवार चालण्याचा अंदाज जयसिंग यास आवडला होता. तो तिचा दिवाना झाला होता.

जयसिंगच्या मनातील विचारांचे द्वंद्वयुद्ध ओळखण्यास लक्ष्मणच्या पत्नीला अजिबात वेळ लागला नाही. आजवरच्या वैवाहिक जिवनाच्य वाटचालीवरुन ती एक पारंगत महिला झाली होती. तिला पुरुषांच्या चालीरीती चांगल्याप्रकारे समजत होत्या. त्यामुळे जयसिंग आपला दिवाना झाला असल्याचे ती समजून चुकली होती. जयसिंग नेहमी नेहमी तिच्या मागेपुढे करत तीची जणूकाही जी हुजूरी करत होता. त्यावरुन ती काय समजायचे ते समजली होती.

बघता बघता लक्ष्मणच्या गैर हजेरीत जयसिंग त्याच्या घरी हजेरी लावू लागला. त्यामुळे लक्ष्मणच्या पत्नीसोबत बोलण्यास जयसिंगला जास्त वेळ अर्थात एक्स्ट्रॉ टॉक टाईम मिळू लागला. या टॉक टाईमचे रुपांतर हळूहळू जयसिंगने तिच्यासोबत स्पर्श करण्यात केले होते. तिला जयसिंगचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला. जयसिंग एक सधन शेतकरी होता. त्या तुलनते लक्ष्मणची परिस्थीती बेताची होती. त्यामुळे हाच धागा पकडून जयसिंगने लक्ष्मणच्या पत्नीवर आपले जाळे फेकण्यास सुरुवात केली होती. त्यात तो ब-यापैकी यशस्वी झाला होता. लक्ष्मणची पत्नी व जयसिंग यांचा राजीखुशीचा मामला रंगात आला होता.

लक्ष्मण हा मेंढपाळाचे काम करत असे. तो मेंढपाळाच्या कामाला गेला म्हणजे इकडे सधन जयसिंग त्याच्या घरी हजेरी लावत असे. त्यातून जयसिंग व लक्ष्मणच्या पत्नीचे प्रेम प्रकरण आकार घेत असे.

संतोष गोसावी स.पो.नि.

लक्ष्मण यास दारु पिण्याचे व्यसन होते. कुणी दारु प्यायला दिली म्हणजे त्याची कळी खुलत असे. हाच धागा पकडून मित्र म्हणवणा-या जयसिंगने लक्ष्मण यास दारुचे आमिष दाखवून त्याला वेळोवेळी दारु पिण्यास नेण्याचे काम सुरु केले. मोलमजुरी करणारा लक्ष्मण दारुच्या लोभातून जयसिंगने दिलेली दारु घेवू लागला. त्यामुळे संधी साधून जयसिंग व लक्ष्मणची पत्नी यांच्यातील संपर्क वाढू लागला.

वेळोवेळी संधी हेरुन जयसिंग व लक्ष्मणच्या पत्नीचा एकमेकांना भेटण्याचा प्रकार सुरुच होता. दोघांच्या या विवाहबाहय संबंधाचा प्रकार गावातील लोकांना समजण्यास वेळ लागला नाही. गेल्या काही वर्षापासून लक्ष्मणच्या पत्नीसोबत सुरु असलेले जयसिंगचे संबंध गावात एक चर्चेचा विषय झाला होता. हा विषय लक्ष्मणच्या कानावर जाण्यास वेळ लागला नाही.

आपल्या परिवाराच्या प्रतिष्ठेचा विषय लक्षात घेवून लक्ष्मण याने पत्नीला समजावले. मात्र समजावून देखील लक्ष्मणची पत्नी तिचे वळण सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे पती पत्नीत वाद होवू लागले. हे वाद कधी कधी विकोपाला जावू लागले. लक्ष्मणच्या पत्नीला पतीपेक्षा परका जयसिंग जवळचा वाटत होता.

आता लक्ष्मणने दोघांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. एके दिवशी लक्ष्मण यास दोघे एकाच ठिकाणी नको त्या अवस्थेत रंगेहाथ सापडले. त्यामुळे चिडलेल्या लक्ष्मणने दोघांना चांगलाच शाब्दीक मार दिला.

संतापाच्या भरात लक्ष्मणने जयसिंग यास शाब्दीक मार देत त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. दोघातील वाद वाढत गेला. त्यामुळे परिसरातील लोकांनी दोघांचा वाद मिटवण्याचे काम केले.

आपल्या पत्नीचे जयसिंगसोबत असलेले संबंध गावातील लोकांना समजल्यामुळे लक्ष्मणची मानसिकता खराब झाली होती. त्यातून त्याने पत्नीला देखील मोठ्या प्रमाणात रागावून आपल्या मनातील अग्नी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या त्याच्या मनातून पत्नी व जयसिंग बद्दल असलेला राग जाण्यास तयार नव्हता. या संतापाच्या भरात लक्ष्मण जास्तच दारु पिवू लागला. दारुच्या नशेत तो पत्नी व जयसिंगला शिवीगाळ करत असे. असे असले तरी जयसिंग सोबतच्या त्या सुखाला भुललेली लक्ष्मणची पत्नी काही केल्या ते संबंध तोडण्यास तयार नव्हती. तिला गावातील आपल्या व आपल्या परिवाराच्या इज्जतीचे काही  देणेघेणे नव्हते.

अखेर या संतापाचा शेवट करण्याचे लक्ष्मणने मनाशी ठराले. आता जयसिंगला कायमची अद्दल घडवायची असा विचार त्याने मनातल्या मनात सुरु केला. तो जयसिंगवर बारकाईने लक्ष ठेवू लागला. तो शेतात केव्हा जातो व केव्हा परत येतो. तो कुठे कुठे केव्हा जातो या सर्व गोष्टींवर लक्ष्मणचे लक्ष होते.

गुरुवार दि.४ जून रोजी जयसिंग नेहमीप्रमाणे आपल्या मोटार सायकलने गुरांना वैरण आणण्यासाठी गेला होता. हिच संधी साधत तो परत येण्याची वाट लक्ष्मण बघू लागला. लक्ष्मणच्या पाठीवर नेहमीच फरशी कु-हाड रहात असे. त्यामुळे गावात व परिसरात त्याची दहशत निर्माण झाली होती. जुना कुंभारगाव – शिरगाव रस्त्यावर सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास लक्ष्मण दबा धरुन बसला. त्यावेळी रस्त्यावर वर्दळ नव्हती. काही वेळाने जयसिंग वैरण घेवून परत येत असल्याचे लक्ष्मणच्या नजरेने टिपले.

दबा धरुन बसलेल्या लक्ष्मणने जयसिंगचा रस्ता अडवला. नेहमीप्रमाणे लक्ष्मणच्या खांद्यावर फरशी कु-हाड होतीच. काही समजण्याच्या आत लक्ष्मणने हातातील कु-हाडीने जयसिंगवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या घडामोडीत जयसिंगच्या ताब्यातील मोटार सायकल फेकली गेली. जयसिंग खाली पडताच लक्ष्मणने त्याचे धड व शरीर वेगवेगळे केले. कु-हाडीच्या घावात जयसिंगचे धड व शरीर वेगवेगळे झाले होते. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.  

माझ्या बायकोसोबत संबंध ठेवतो काय ? असे बरळत संतापलेल्या लक्ष्मणने त्याला कायमचा धडा शिकवला. काही वेळाने तो शांत झाला. भानावर आल्यानंतर तो तेथून पळून गेला.

या थरारक घटनेची माहिती चिंचणी वांगी पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यास वेळ लागला नाही. घटनेची माहिती मिळताच स.पो.नि.संतोष गोसावी आपल्या सहकारी कर्मचारी वर्गासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली होती. या घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस उपविभागीय अधिकारी अकुंश इंगळे हे देखील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासकामी सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांना योग्य त्या सुचना केल्या.

पोलीसांनी मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा केला. जयसिंग जमदाडे याचा मृतदेह शवविच्छेदन कामी सरकारी दवाखान्यात रवाना करण्यात आला. या प्रकरणी पोलिस पथकाने गावात माहीती घेतली असता मयत जयसिंग शामराव जमदाडे याचे गावातील लक्ष्मण निवृत्ती मुढे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याची चर्चा सुरु होती. त्या चर्चेतून हा खून लक्ष्मण मुढे यानेच केला असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती.

या प्रकरणी चिंचणी वांगी पोलिस स्टेशनला फरार लक्ष्मण जमदाडे याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  

फरार व संशयीत लक्ष्मण मुढे याचा शोध पोलीस घेत होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देत होता. एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना समजले की संशयीत लक्ष्मण मुढे हा उसाच्या शेतात लपून बसतो. शेतातील उसाचे पिक खुप असल्यामुळे तो कुणाच्या नजरेस पडत नाही. तो रात्री शेतातून बाहेर पडतो आणि आसपासच्या वस्तीवर जावून जेवण करुन येतो.

मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलिस निरिक्षक संतोष गोसावी यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने त्याच्यावर उसाच्या शेतात पाळत ठेवण्यास सुरुवात केली.

साध्या वेशातील कर्मचा-यांनी गावक-यांच्या मदतीने सलग तिन रात्र त्याच्यावर पाळत ठेवली. अखेर 9 जूनच्या रात्री अकरा वाजता फरार लक्ष्मण मुढे हा परिसरातील शिरगाव शिवारातील उसाच्या शेतात लपून बसला असल्याची पक्की माहिती मिळाली. खात्री झाल्यानंतर उसाच्या शेताला वेढा घालण्यात आला. पोलिस आपल्या मागावर असल्याची लक्ष्मण यास चाहुल लागली. तो पळून जाण्याच्या बेतात असतांना त्याच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले.

त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी करण्यात आली. त्याने सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या समक्ष आपला गुन्हा कबुल केला. त्याला अटक करण्यात आली. त्याला कडेगाव प्रथम वर्ग न्यायधिसांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सुरुवातीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला. तसेच गुन्हयात वापरलेली रक्ताने माखलेली कु-हाड काढून दिली. 

सांगली जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले, विटा उप विभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयाचा पुढील तपास चिंचणी वांगी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संतोष गोसावी करत आहेत. या गुन्हयाच्या तपासकामी कर्मचारी पोपट पवार, अधिक बनवे, गोविंद चन्ने, उदय देशमुख,अमर जेगम, आनंदा पवार, विशाल सांळुखे, रोहित कुंभार, राहुल कुंभार, सत्यवान मोहिते, पोलीस मित्र राजु जाधव, प्रकाश जाधव, सत्यवान शिरतोडे, डॉ.प्रमोद गावडे, श्रीदास होनमाने, विठ्ठल भोसले आदी परिश्रम घेत आहेत. या गुन्हयातील फरार संशयीत आरोपीस पकडण्याकामी देवराष्ट्रे गावाचे ग्रामस्थांनी देखील अथक परिश्रम घेतले.

या घटनेनंतर जयसिंगचे मुंडके पत्नीला दाखवून तिची देखील हत्या करण्याचा संशयीत आरोपी लक्ष्मण याचे नियोजन होते. त्यानंतर दोन्ही मुंडकी सोबत घेवून पोलिस स्टेशन गाठण्याचा त्याचा विचार होता. तसे त्याने कोठडी दरम्यान पोलिसांना सांगितले.

जयसिंगचा मृतदेह – घटनास्थळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here