मुंबई : मुंबईचे शिवाजी पार्क शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिवंगत शिवसेना सुप्रिमो बाळासाहेब ठाकरेंची गर्जना याच शिवाजी पार्कवरुन होत असे. या शिवाजी पार्कचे नावा आता बदलण्यात आले आहे. राज्यातील ठाकरे सरकारने या पार्कचे नामांतर केले असून शिवाजी पार्क आता यापुढे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या नावाने ओळखले जाणार आहे.
मुंबई म.न.पा. कडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात महापालिका सभागृहात मांडण्यात आला होता. यापूर्वी मुंबईतील सर्वात मोठे टर्मिनस सीएसटीचे देखील नाव बदलण्यात आले होते.
शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानावर शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होत असतात. या मैदानाला 10 मे 1927 रोजी शिवाजी पार्क असे नाव देण्यात आले होते. तसा ठराव त्यावेळी महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर 73 वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलले आहे. या मैदानाचे जुने नाव माहिम पार्क असे होते.
शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळे या मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरु होती.