पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार बिहारचे सातवे मुख्यमंत्री ठरले आहे. राजभवनावर हा शपविधी सोहळा पार पडला. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीशकुमार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या शपथविधी सोहळ्याला हजर होते.
भाजपने नवी खेळी करत ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रीपदापासून दुर सारले आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांची निवड करण्यात आली आहे.
नितीश कुमार यांच्यानंतर या दोघांनी शपथ घेतली. त्यानंतर जेडीयूच्या वतीने विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला कुमारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. शीला कुमारी या प्रथमच मंत्री झाल्या आहेत.
हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या वतीने संतोष सुमन आणि विकासशील इंसान पार्टीच्या वतीने मुकेश सहानी यांना शपथ देण्यात आली. भाजपच्या वतीने तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांच्याव्यतिरिक्त मंगल पांडेय, अमरेंद्र प्रताप, रामप्रीत पासवान, जीवेश कुमार, रामसूरत राय यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
भाजपच्या वाटाघाटीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य भुमिका बजावली. बिहारच्या या निवडणुकीत एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. यामधे भाजप 73, जेडीयू 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकास इंसाफ पार्टीच्या प्रत्येकी 4 जागा आहेत. या पक्षांना त्यांच्या योग्यतेनुसार मंत्रीपदे देण्यात आली आहेत. राजद आणि काँग्रेससह महाआघाडीने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला.