मुंबई : लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलातून 100 युनिटपर्यंतची वीज माफ करणार असल्याचा शब्द उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला होता. राज्यातील जनतेला दिलेला तो शब्द आपण पाळणार असल्याचे आणि त्यावर ठाम असल्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. गेल्या भाजप सरकारने केलेल्या थकबाकीचे काय असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
नितीन राऊत पत्रकार परिषदेत बोलत असतांना त्यांनी म्हटले की 100 युनिट वीज माफीची भुमीका आपण अजुनही बदललेली नाही. भाजप नेत्यांनी वाढीव विजबिलासह कार्यालयात यावे, त्यांच्याशी चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. गेल्या सरकारने जे पाप करुन ठेवले आहे त्याचे अगोदर निरसन करावे लागेल. त्यानंतरच शंभर युनीट विजमाफीचा निर्णय घेतला जाईल असे देखील नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
वीज कंपन्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती पत्रकारांना देत असतांना राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला. महावितरण कंपनीची मार्च 2014 अखेरची थकबाकी 14 हजार 154 कोटी रुपये एवढी होती. ही थकबाकी आता 59 हजार 14 कोटी रुपये एवढी झाली आहे. माजी ऊर्जामंत्र्यांनी चांगलं काम केल्याचे दावे भाजपाकडून केले जात असले तरी आकडेवारी मात्र वेगळेच सांगत असल्याचे खोचक विधान देखील उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.
भाजपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर आपल्याला फार आनंद होईल. याचे कारण म्हणजे आपण केंद्राला वारंवार पत्र लिहून ऊर्जा विभागाकडे 10 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. मात्र, केंद्राने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपने केंद्राविरोधात आंदोलन करावे असे राऊत यांनी म्हटले आहे.