जळगाव : जळगाव शहरात विविध व्यापारी संकुलातील पार्कींगच्या (बेसमेंट)जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामाला विरोध दर्शवण्यासाठी सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता 7 डिसेंबर रोजी एक दिवसीय उपोषण करणार आहेत. हे उपोषण ते मनपा आयुक्त कार्यालयाच्या दालनात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान करणार आहेत.
या उपोषणासाठी 4 बाय 4 आकारमान असलेल्या जागेची शासकीय फी भरण्यास त्यांनी लेखी परवानगी आयुक्तांच्या नावे पत्र देवून मागीतली आहे. मात्र मनपा प्रशासनाकडून गुप्ता यांना कोणत्याही फी बाबत मागणी करण्यात आलेली नाही.
जळगाव शहरातील विविध व्यापारी संकुलातील पार्कींगच्या तळघरातील जागेत व्यावसायीक वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकाच्या रुपात आलेल्या दुचाकीधारकांना त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहने भर रस्त्यावर लावावी लागतात. वाहने रस्त्यावर लावल्यानंतर शहर पोलिस वाहतुक शाखेकडून कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे “आई जेवू देत नाही आणी बाप भिक मागू देत नाही” अशी वाहनधारकांची गत झाली आहे. वाहनधारकांचा हा प्रश्न सुटत नसेल तर वाहनधारकांना शहर वाहतुक शाखेकडून केला जाणारा दंड मनपाने भरावा अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.