मुंबई : शनिवार 12 डिसेंबरपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे आणि रा.कॉ.च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: रक्तदान केल्यानंतर नागरिकांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान केले. याप्रसंगी राजेश टोपे म्हणाले की, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेकामी आठशे रुपयांचे शुल्क आकारले जाते. मात्र आता यापुढे शासकीय रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्त उपलब्ध करुन दिले जाईल. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.
रक्त तयार करता येत नाही तसेच संकलीत केलेले रक्त दीर्घकाळ साठवता देखील येत नाही. त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन टोपे यांनी केले.