जळगाव : राजू शामराव मिरटकर हा दगडी पाटे, वरवंटे तयार करणारा कारागीर होता. जुन्या काळातील गृहीणी स्वयंपाकासाठी लागणारा मसाला पाटा आणि वरवंट्यावर वाटून तयार करत होत्या. आता या आधुनिक युगातील गृहिणी वेळेची बचत करण्यासाठी मिक्सरचा वापर करुन स्वयंपकाचा मसाला तात्काळ तयार करतात. मात्र असे असले तरी पोटाची खळगी भरण्यासाठी पाटे वरवंटे तयार करणारा समाज आपला पारंपारीक व्यवसाय करतच आहेत.
बुलढाणा जिल्ह्यतील मोताळा या तालुक्याच्या ठिकाणी राजू शामराव मिरटकर हा तरुण पाटे वरवंटे तयार करण्याचे काम करत होता. पत्नी विमलबाई व तिन मुले अशी त्याच्या संसाराची दुनिया होती. मोताळा तालुक्यातील कोथळी हे त्याचे सासर होते. त्याच्या शालकाचे नाव सुनिल रामेश्वर गायकवाड असे होते. राजुचा शालक अर्थात त्याच्या पत्नीचा भाऊ सुनिल गायकवाड हा सध्या नांदुरा येथे रहात होता.
सुनिल अधुनमधून त्याची बहिण विमलबाई व मेहुणा राजु मिरटकर यांना भेटण्यास मोताळा येथे येत असे. राजूच्या तिघा मुलांना मामा सुनिलचा लळा लागलेला होता. अशा प्रकारे राजूचे एकंदरीत सर्व काही व्यवस्थित सुरु होते. सर्व काही व्यवस्थीत सुरु असतांना अचानक राजूच्या जिवनात दुर्दैवाचा एक फेरा आला.
गेल्या सहा ते सात महिन्यापुर्वी राजु त्याची पत्नी विमलबाई व रोशन नावाचा मुलगा असे तिघेजण दुचाकीने ट्रिपलसिट वाशीम येथे जात होते. त्याची इतर दोन मुले त्यावेळी घरीच होती. वाशीम येथे दुचाकीने ट्रिपल सिट जात असतांना अचानक त्याच्या वाहनाचा अपघात झाला. या रस्ता अपघातात राजूची पत्नी विमलबाई व मुलगा रोशन असे दोघे जण मयत झाले. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. या रस्ता अपघातात राजूची पत्नी व मुलगा असे दोघे जण काळाच्या पडद्याआड गेले, मात्र राजू सुदैवाने बचावला होता. त्याची अर्धांगीनी विमलबाई व मुलगा रोशनच्या अपघाती निधनामुळे राजूवर मोठे आभाळ कोसळले होते. मात्र हे दुख: पचवण्याची शक्ती देखील त्याच्याकडे होती.
अपघाताच्या वेळी राजूची इतर दोन मुले घरी असल्यामुळे ती बचावली होती. मात्र त्या मुलांना आईचे प्रेम मिळणे आता कठीण होते. तसेच त्यांची देखभाल करणारी त्यांची आई या जगात नव्हती. त्यामुळे त्यांची देखभाल व्यवस्थीत होणे गरजेचे होते. त्यामुळे त्याची दोन्ही मुले मामाच्या घरी अर्थात सुनिल रामेश्वर गायकवाड याच्याकडे नांदुरा येथे राहण्यास गेली. त्या दोन्ही मुलांचा सांभाळ सुनिल गायकवाड करु लागला.
या अपघाती घटनेनंतर राजू मिरटकर काही प्रमाणात सावरला. त्याचे वय 28 वर्ष होते. तो एकदम तरुण होता. त्याच्या पुढे अजून बरेच आयुष्य पडलेले होते. त्यामुळे त्याने दुसरा विवाह करण्याचे मनाशी ठरवले. त्याची दोन्ही मुले मामाच्या गावी रहात असल्यामुळे तो एकटाच होता. तसे बघता शालकाकडे राहणा-या दोन्ही मुलांकडे त्याचे एक प्रकारे दुर्लक्षच झाले होते. मोताळा येथे तो एकटा रहात असल्यामुळे आता आपल्याला एका अर्धांगीनीची गरज असल्याची जाणीव त्याला होत असे. त्या दृष्टीने तो मुलगी बघण्याच्या कामाला लागला होता.
आपली बहिण व एक भाचा यांचे निधन झाल्यानंतर दोन्ही भाचांचा सांभाळ करणा-या सुनिल गायकवाड यास मेहुणा राजु मिरटकर दुसरे लग्न करण्याच्या विचारात असल्याची माहिती समजली. सुनिलची बहिण विमलबाई व तिच्या एका मुलाचे अपघाती निधन झाल्यानंतर अजून काही महिनेच झाले होते. त्यांच्या निधनाला अजुन वर्ष देखील पुर्णपणे उलटले नव्हते. अशा परिस्थितीत राजु दुसरे लग्न करणार असल्याचे समजताच शालक सुनिल गायकवाड याला राजुच्या वागण्याबद्दल शंका येवू लागली.
दुसरे लग्न करण्यासाठीच राजुने आपल्या बहिणीला व भाचाला जिवे ठार केले असा त्याला संशय येवू लागला. या संशयातून तो बेचैन राहू लागला. आपल्या बहिणीला व भाचाला राजूने हेतू पुरस्सर अपघाती ठार केले असा मनोमन संशय सुनिल घेवू लागला. या संशयाला दुसरे कारण म्हणजे सुनिलकडे राहणा-या त्याच्या दोन्ही मुलांकडे तो अजिबात लक्ष देत नव्हता. त्यामुळे सुनिलचा राजूवरील संशय गडद झाला होता. त्याने त्याच्या मनातील संशय त्याचा मावसभाऊ रमेश रामदास पवार यास बोलून दाखवला. रमेश रामदास पवार हा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे रहात होता.
दोघे मावसभाऊ एकत्र आल्यावर त्यांनी संशयातून राजू मिरटकर याचा कायमचा काटा काढण्याचे अर्थात त्याला जिवनातून बाद करण्याचे विचार सुरु केले. आपले दोन्ही शालक सुनील गायकवाड आणि रमेश पवार आपल्या जीवावर उठणार आहेत याची राजू यास अजिबात कल्पना नव्हती. तो आपल्या दुस-या लग्नाच्या तयारीने कामाला लागला होता. इकडे त्याचे दोन्ही शालक सुनिल व रमेश त्याला संपवण्याच्या तयारीने कामाला लागले होते. दोघांनी त्याच्या खूनाचा कट रचण्यास सुरुवात देखील केली होती.
राजूची बहिण भुसावळ येथील यावल नाका परिसरात रहाते. राजू एकटा असल्यामुळे तो गेल्या दोन महिन्यापासून त्याच्या भुसावळ येथील बहिणीकडे राहण्यास आला होता. राजूचा मावस शालक रमेश पवार भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे रहात होता. राजू भुसावळ येथे त्याच्या बहिणीकडे रहात असल्याचे रमेश पवार यास समजले होते.
सुनिल व रमेश या दोघा मावसभावांनी राजूच्या हत्येचा कट रचला होता. त्या कटाचा भाग म्हणून रमेश हा राजुच्या बहिणीकडे त्याला भेटण्यासाठी आला. रमेशने राजूला म्हटले की तुझ्या पत्नीच्या अपघाताचे पैसे गावी मोताळा येथे आले आहेत. आपल्याला कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी मोटार सायकलने मोताळा येथे जायचे आहे. अशाप्रकारे पैसे घेण्याचा बहाणा करत रमेशने राजुला मोटार सायकलवर बसवून मोताळा येथे येण्यास भाग पाडले. रमेशच्या मोटारसायकलवर राजु डबलसीट बसला. दोघे जण मोताळा येथे जाण्यासाठी निघाले.
अगोदरच नियोजन केल्यानुसार रमेशने राजू यास वाटेत नांदुरा येथे सुनिलच्या घरी नेले. आपण पत्नीच्या नावे असलेले पैसे घेण्यास जात नसून साक्षात मृत्यूच्या दाराशी यमाकडे जात असल्याचे राजूला माहीत देखील नव्हते. त्याला अंधारात ठेवण्यात आले होते.
वाटेत नांदुरा येथे सुनिलच्या घरी 9 ऑक्टोबर रोजी गेल्यावर तिघांनी काहीवेळ गप्पाटप्पा केल्या. त्यानंतर पाटे वरवंटे तयार करण्याच्या जागी निर्जन ठिकाणी त्याला नेण्यात आले. तेथे गोड बोलून त्याला दारु पाजण्यात आली. दारुचा अर्थात मद्याचा अंमल राजुवर होण्यास वेळ लागला नाही. राजुवर मद्याचा अंमल सुरु झाल्यानंतर सुनिल व रमेश या दोघा मावस भावांनी त्याला जळगाव जामोद नजीक भेंडवळ गाव शिवारात नेले. त्याठीकाणी दोघांनी त्याला लोखंडी सांडशीने मारहाण सुरु केली. याशिवाय दोघा मावस भावांनी त्याला लाथा बुक्क्यांनी देखील बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजुने आपला जिव सोडला. राजु जिवानिशी गेल्याचे लक्षात आल्यावर दोघा मावस भावांनी राजुला भेंडवळ गावाच्या जंगलात बेवारस सोडून देत पलायन केले.
काही दिवसांनी राजुचा बेवारस मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली. त्याच्या मृतदेहाचे लचके पशु पक्षांनी तोडण्यास सुरुवात केली होती. हळूहळू त्याच्या मृतदेहाची हाडे व कवटी शिल्लक राहिली.
या सर्व घटनाक्रमानंतर रमेश आपल्या गावी भुसावळ (कंडारी) येथे परत आला मात्र राजु परत आलाच नाही. त्यामुळे यावल नाका परिसरात राहणारी राजूची बहिण सुनिता पवार हिने राजु कुठे आहे? अशी रमेशला विचारणा केली. त्यावर त्याने सुनीता हिस उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. रमेशच्या उत्तराने सुनिताचे समाधान झाले नाही.
त्यामुळे तिने काही नातेवाईकांना सोबत घेत मोताळा गाठले. तेथील बोराखेडी पोलिस स्टेशनला त्यांनी रमेश विरुद्ध भा.द.वि. 365 (अपहरण) प्रमाणे राजुच्या अपहरणाबाबत तक्रार दाखल केली. रमेश याने राजुला भुसावळ श्हर पोलिस स्टेशन हद्दीतून नेले होते. त्यामुळे बोराखेडी पोलिसांनी तो गुन्हा भुसावळ शहर पोलिसांकडे वर्ग केला. भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदिप दुनगहु यांच्याकडे सोपवला. स.पो.नि. संदिप दुनगहू यांनी आपले सहकारी समाधान पाटील यांच्या मदतीने या तपासाला सुरुवात केली.
तपासाचा भाग म्हणून बुलढाणा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे या कालावधीत दाखल दाखल झालेल्या अकस्मात मृत्यूबाबत चौकशी करण्यात आली. दरम्यान 31 ऑक्टोबर रोजी भेंडवळ गावाच्या जंगलात एका बेवारस मृतदेहाच्या हाडांचा सापळा जळगाव जामोद पोलिसांना मिळून आला होता. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला 67/20 या क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. या अकस्मात मृत्यूमधील मृतदेहाचा हाडांचा सांगाडा तेवढा शिल्लक राहिला होता. त्यामुळे या सांगाड्याची ओळख पटणे कठीण झाले होते. या अकस्मात मृत्यूचा तपास पोलिस उप निरिक्षक रमेश धामोळे करत होते.
या अकस्मात मृत्यूच्या मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संदिप दुनगहू यांनी तेथील तपास यादी तपासकामी मागवून घेतली. त्या तपास यादीवरील फोटो राजुची बहिण सुनीता पवार व तिच्या भावांना दाखवण्यात आला. तपास यादीवरील मयताच्या हाडांचा सांगाडा असलेला फोटो सुनीता पवार हिने तो फोटो तिचा भाऊ राजु मिरटकर याचा असल्याचे ओळखले.
त्यामुळे सुनिता पवार हिच्यासह तिच्या नातेवाईकांना तपासकामी जळगाव जामोद येथे नेण्यात आले. मयताचे कपडे व इतर वस्तू त्यांना दाखवण्यात आले. ते कपडे त्यांनी राजुचे असल्याचे ओळखले. अशा प्रकारे मयताचा सापळा व फोटो हा राजु मिरटकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयीत म्हणून कंडारी येथील रमेश पवार यास अटक करण्यात आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रमेश पवार याची बहिण विमलबाईचे लग्न राजु मिरटकर याचे सोबत झाले होते. रस्ता अपघातात त्याच्या सोबत मोटारसायकलवर विमलबाई व एक मुलगा रोशन यांचे निधन झाले होते. मात्र राजु बचावला होता. राजुने हेतू पुरस्सर पत्नी विमलबाई व मुलगा रोशन यांना ठार केले असल्याचा रमेश यास संशय होता. शिवाय रमेश त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत होता. त्या दोन्ही मुलांकडे राजु अजिबात लक्ष देत नव्हता. तसेच तो दुस-या लग्नाचा विचार व त्या दष्टीने नियोजन करत होता. दुसरे लग्न करण्यासाठीच त्याने आपली बहिण विमलबाई व भाचा रोशन यांना रस्ता अपघातात ठार केले असल्याचा संशय रमेश यास होता. त्यामुळे त्याने त्याचा मावसभाऊ सुनिल गायकवाड याच्या मदतीने राजुला ठार केल्याचे कबुल केले.
पोलिस चौकशीत व तपासात रमेशने त्याचा मावसभाऊ सुनिल गायकवाड याचे नाव पुढे आणले. त्यामुळे त्याला देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने देखील आपला गुन्हा कबुल केला. 9 ऑक्टोबर रोजी सदर घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शिवारातील भेंडवळ गावाच्या जंगलात घडली होती. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी राजुच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. 20 नोव्हेंबर रोजी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला दाखल झालेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप दुनगहू व त्यांचे सहकारी समाधान पाटील यांनी सुरु केला.
सुरुवातीला या गुन्ह्यात रमेश पवार याच्या विरुद्ध बोराखेडी पोलिस स्टेशनला भा.द.वि.365 (अपहरण) नुसार गुन्हा दाखल होता. त्यानंतर तपासात झालेल्या प्रगतीनुसार रमेश पवार आणि सुनिल गायकवाड यांच्याविरुद्ध भा.द.वि.302 (खून), 120 (ब) (कट रचणे), 364 (जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण) अशी कलमे वाढवण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संदिप दुनगहु व पो.कॉ.समाधान पाटील यांनी पुर्ण केला. तपासकामी हवालदार मोहम्मद अली सैय्यद, पो.कॉ. मोहन पाटील, जितू सोनवणे यांचे सहकार्य लाभले. सध्या या गुन्ह्याचा तपास जळगाव जामोद (जिल्हा बुलढाणा) यांचेकडे वर्ग करण्यात आला असून तपास पोलिस उप निरिक्षक रमेश धामोळे करत आहेत.