जळगाव : गेल्या जून महिन्यात एमआयडीसी परिसरातील जागेवर अंदाजे 70 ब्रास अवैध वाळू साठा आढळून आला होता. या अवैध वाळू साठ्याबाबत कारवाईसाठी माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी उप जिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे यांच्याकडे 27 जून रोजी मोबाईलवर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वेळोवेळी सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. माहिती अधिकार तथा सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या पाठपुराव्याला यश आले असून संबंधीत दोघांना आकारण्यात आलेल्या 17 लाख 23 हजार 800 रुपयांची दंडात्मक रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली आहे.
27 जून रोजी एमआयडीसी परिसरातील डी – 34 या चेतन कृष्णा पाटील व अनिल चंद्रभान पाटील यांच्या मालकीच्या सी.के.प्रॉडक्ट्स या जागेवर अंदाजे 70 ते 80 ब्रास वाळू साठा आढळून आला होता. याप्रकरणी मेहरुण भागाचे तलाठी यांनी पंचनामा करुन वरिष्ठांकडे अहवाल सादर केला होता.
त्या अनुषंगाने संबंधितांना रितसर दंडात्मक कार्यवाहीची नोटीस देण्यात आली होती. सदर नोटीसच्या अनुषंगाने संबधितांनी खुलासा सादर केला होता. मात्र त्यांचा खुलासा अमान्य करुन त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईचे आदेश पारीत करण्यात आले होते.
अनिल कृष्णा पाटील व चेतन कृष्णा पाटील या दोघांनी 10 डिसेंबर रोजी चलनाद्वारे 17 लाख 23 हजार 800 रुपयांची दंडात्मक रक्कम शासकीय खजिन्यात जमा केली आहे.