मुंबई : ‘लाच घेणे – लाच देणे’ हा कायद्याने अपराध आहे. मात्र काही महाभाग लाचखोरी सोडत नाही. वाहतूक पोलिसांना लाच घेताना अनेक वेळा रंगेहाथ पकडण्यात येते. मुंबईच्याएका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा लाच घेत असतांना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रस्त्यावर स्कुरवरून विना हेल्मेट जाणाऱ्या एक तरुणीला महिला वाहतूक पोलिसांनी अडवले होते. त्या तरुणीची रितसर चौकशी केल्यानंतर तिला दंडाची रक्कम देखील सांगण्यात आली. या तरुणीने हेल्मेट न घातल्यामुळे महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने सदर कारवाई सुरु केली होती. मात्र पावती न फाडता ‘काही तरी घ्या’ असं म्हणून सुटण्याचा प्रयत्न या तरुणीने सुरु केला होता.
या तरुणीने महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास लाच देण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यानंतर हो नाही हो नाही करत करत अखेर महिला कॉन्स्टेबलने लाच घेण्याची तयारी दर्शवली. मात्र भर रस्त्यात पैसे कसे घेणार हा यक्षप्रश्न तयार झाला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने हळूच आजूबाजूला बघत तरुणीला पैसे देण्यासाठी कोप-यात बोलावले.
त्यानंतर तरुणीने रक्कम सरळ महिला कर्मचाऱ्याच्या पॅन्टच्या मागील खिश्यातच ठेवले.
त्यानंतर तरुणी आपल्या स्कुटरकडे येत निघून गेली.हा सर्व घटनाक्रम एका मोबाईलमध्ये कैद केला.
हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे समजू शकले नसले तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.