जळगाव : देशाची भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो. आजची निरागस मुले उद्याचे नागरीक असतात. त्या नागरीकांना घडवण्याचे मोठे काम शिक्षक वर्गावर असते. एका आदर्श शिक्षकाचा दोघा मद्यपी तरुणांनी खून केल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी घडल्यामुळे विद्यादानाच्या क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती. या हत्येमागचे नेमके कारण काय असावे याचा उलगडा जोवर होत नव्हता तोपर्यंत चर्चेला विविध प्रकारचे उधान आले होते. विविध तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र दोघा मद्यपींनी केवळ दारुच्या नशेत झालेल्या झटापटीत शिक्षकाची हत्या केल्याचे पोलिस तपासात अखेर उघड झाले. मात्र एका आदर्श शिक्षकाची हत्या होणे ही खरोखरच एक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.
किशोर पाटील कुंझरकर हे एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी राहणारे शिक्षक होते. त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. गालापुर जिल्हा परिषद शाळेचे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शैक्षणीक क्षेत्रात किशोर पाटील कुंझरकर हे नाव सर्वांना चांगल्या प्रकारे परिचीत होते. विविध वृत्तपत्रांना माहितीपर लेख देण्यात त्यांचा हातखंडा होता. दिनविशेष या सदरात माहितीपर लिखान वृत्तपत्रांना वेळोवेळी देण्याचे काम ते आवर्जुन करत होते.
मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी किशोर पाटील यांचा दिनक्रम व्यस्त होता. एरंडोल येथील संताजी गृपने आयोजीत केलेल्या संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी मनोगत देखील व्यक्त केले. त्यानंतर सायंकाळी भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते भुसावळला गेले होते. भुसावळ येथून रात्री साडे दहा वाजता ते एरंडोल येथे घरी परतले. त्यानंतर लागलीच दुस-या दिवशी भल्या पहाटे त्यांना धुळे येथे मित्राकडे व तेथून सुरत येथे जाण्याचे नियोजन होते.
9 डिसेंबरच्या भल्या पहाटे साडे तिन वाजता त्यांनी तयारी करुन घर सोडले. त्यांची शिक्षीका असलेली पत्नी झोपेत असल्यामुळे त्यांनी तिला जागे केले नाही. मुलाला दरवाजा आणि गेट लावून घेण्यास सांगीतले. मुख्याध्यापक किशोर पाटील हे पायीच बस स्थानकाच्या दिशेने चालत गेले. वाटेत एरंडोल शहरातील धरणगाव चौफुली परिसरात आले असता त्याठीकाणी तेथे एक शेकोटी पेटलेली त्यांना दिसली.
थंडी वाजत असल्यामुळे मुख्याध्यापक कुंझरकर रस्त्याच्या कडेला त्या शेकोटीवर बसले. दरम्यान त्याठिकाणी वाल्मीक रामकृष्ण पाटील (32) व आबा भारत पाटील (25) हे दोघेही सोनबर्डी येथील तरुण दुचाकीने आले. वाल्मिकच्या भाचीचा हळदीचा कार्यक्रम अंजनविहीरे येथून आटोपून दोघेही एरंडोल येथे आले होते. हळदीच्या कार्यक्रमात दोघांनी मद्यप्राशन केले होते. त्या मद्याचा अंमल दोघांवर अजून कायम होता. त्यामुळे त्यांच्या हालचाली दोलायमन होत्या. त्यातच ते दुचाकी चालवत आले होते.
शिक्षक कुंझरकर व हे दोघे मद्यपी असे तिघे जण शेकोटीजवळ बसले होते. दोघे तरुण मद्याच्या धुंदीत तर्रर्र झाले होते. त्यांना काय बोलावे हेच सुचत नव्हते. त्यातच शिक्षकी पेशा असलेल्या किशोर पाटील यांना राहवले गेले नाही. त्यांनी दोघांना दारु पिण्यावरुन हटकले.
दारु पिण्यावरुन हटकल्याचा राग आबा व वाल्मिक या दोघा मद्यपींना येण्यास अजिबात वेळ लागला नाही. त्यामुळे मद्याच्या नशेत दोघांनी मिळून शिक्षक किशोर पाटील यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. काहीवेळाने किशोर पाटील यांनी ते भांडण कसेबसे मिटवले. ते बस स्थानकाजवळ असलेल्या वॉटर एटीएम जवळ आले. दोघांचा राग शांत झालेला नव्हता. तसेच किशोर पाटील यांचे समजावणे त्यांच्या पचनी पडत नव्हते. त्यामुळे दोघा मद्यपींनी बस स्थानकावर पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघे मद्यपी आडंदाड वृत्तीचे व शरीरयष्टीचे असल्यामुळे त्यांनी किशोर पाटील यांच्यावर जणूकाही कब्जाच केला होता. बस स्थानकावर दोघांनी किशोर पाटील कुंझरकर यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला. या हल्ल्यात ते अर्धमेले झाले. या घटनेच्या वेळी काही लोक तेथे आले. मात्र कुणीही त्यांचा वाद व हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. या हाणामारीत आदर्श शिक्षक कुंझरकर हे डोक्यावर आपटले गेले. त्यात ते अर्धमेले झाले. तशाच अवस्थेत दोघा मद्यपींनी त्यांना त्यांच्या ताब्यातील दुचाकीने मध्यभागी ट्रिपलसिट बसवले. त्यांना पळासदर शिवारात नेले व तेथेच सोडून दिले. दरम्यान कुंझरकरांनी आपले प्राण सोडले होते. त्यांना तशाच अवस्थेत सोडून पलायन करण्यापुर्वी दोघा मद्यपींनी कुंझरकर यांच्या खिशातील पाकीट व मोबाईल काढून घेत पलायन केले.
पळासदड शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती कुणीतरी एरंडोल पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक तुषार देवरे यांना कळवली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. किशोर पाटील हे शिक्षक अनेकांना चांगल्याप्रकारे परिचित होते. त्यामुळे त्यांची ओळख पटण्यास वेळ लागला नाही.
आदर्श शिक्षक किशोर पाटील-कुंझरकर यांचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालय व तेथून उत्तरीय तपासणीकामी जळगाव येथे रवाना करण्यात आला. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यात त्यांना अनेक शंकास्पद बाबी दिसून आल्या. किशोर पाटील यांच्या अंगावरील शर्टाचे बटन तुटलेले आणि बनियन फाटलेला होता. घराबाहेर पडताना घातलेले स्वेटर त्यांच्या अंगावर नव्हते. ते मृतदेहापासून सुमारे २० फुटाच्या अंतरावर लांब पडलेले होते. किशोर पाटील यांच्या पायात बूट आणि खिशातील मोबाइल व पाकिट गायब झालेले होते. एरंडोल पोलिसांनी मयत किशोर पाटील यांची पत्नी, मुलगा, मुलगी, सासरे यांचे इन कॅमेरा जबाब तपासकामी घेतले. झटापटीनंतर हा खून झाल्याचा अंदाज यावेळी लावण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतार सायंकाळी शोकाकुल वातावरणात एरंडोल येथील मरिमाता मंदिरानजीक स्मशानभूमीत किशोर पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 90/20 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी करत होते.
दोघे मद्यपी आरोपी शिक्षक कुंझरकर यांना मारहाण करत असतांना काही लोक हा प्रकार बघत होते. मात्र पोलिसांपुढे कुणीही माहिती देण्यासाठी पुढे आले नाही अथवा पोलिसांच्या आवाहनाला देखील कुणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिस तपासात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील संबंधीत भागातील सीसीटीची फुटेज संकलीत केले. त्यात हॉटेल एकविरा मधील कॅमे-यात झटापटी होतांनाचे चित्रीकरण कैद झाले होते. काही जणांनी ती घटना पाहिल्याचे तपासात उघड झाले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले, सहायक फौजदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांनी या गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला. किशोर पाटील यांच्या घरी जावून पथकाने घटनेच्या दिवशी घटनेच्या कालावधीतील मोबाईल कॉल डिटेल्स ट्रेस केले. त्यानंतर घटनास्थळावरील कॉल ट्रेस केले. एरंडोल शहरात केवळ एकच मोबाईल टॉवर असल्यामुळे तपासकाम सोपे झाले.
कुंझरकर यांचे घर ते घटनास्थळ तसेच घटनेशी संबंधीत असलेल्या दोन तासांच्या कालावधी दरम्यान पोलिसांना 134 जण संशयास्पद वाटले. या संशयास्पद 134 जणांना कुठलीही खबर लागू न देता त्यांच्यावर गुप्तरितीने पाळत ठेवण्यात आली. यातील 14 जण जास्त प्रमाणात संशयास्पद दिसून आले.
तपास पुढे पुढे सरकत असतांना आबा पवार हे हनुमंतखेडा ता. एरंडोल असे नाव पुढे आले. हवालदार विजयसिंग पाटील व सुधाकर अंभोरे या दोघांनी चिकाटीने हनुमंतखेडा या गावात काही ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला. मात्र अशा नावाची कुणी व्यक्ती या गावात रहात नसल्याची माहिती पुढे आली. मात्र विजय पाटील व सुधाकर अंभोरे या दोघांनी चिकाटी सोडली नाही. पवार आडनावाचे सर्वाधिक लोक नजीकच्या सोनबर्डी या गावात रहात असल्याची त्यांनी माहिती मिळवली. सोनबर्डी या गावाचे पोस्ट हनुमंतखेडा असे आहे. सरकारी कामाकाजाच्या तांत्रीक व अपुर्ण माहितीमुळे आबा पवार याच्या गावाचे नाव गायब झाले होते. अखेर विजयसिंग पाटील व सुधाकर अंभोरे या दोघांनी वरिष्ठंच्या मार्गदर्शनाखाली चिकाटीने तपासकाम सुरुच ठेवले.
हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, आर.के.पाटील, राहुल पाटील व भगवान पाटील यांच्या मदतीने आबा पवार या नावाची माहीती काढण्यास सुरुवात केली. संशयाची सुई फिरत असलेल्या आबा पवार याचा भाऊ त्यांना गवसला. आबाचा हरवलेला मोबाईल परत द्यायचा आहे असे सांगून आबा यास शिताफीने रात्री गावाच्या बाहेर बोलावून घेण्यात आले. त्याला ताब्यात घेत बोलबच्चन वापरुन विचारपुस केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने दिलेल्या माहितीतून वाल्मिक रामकृष्ण पाटील याचे नाव पुढे आले.
अशा प्रकारे आबाच्या माध्यमातून वाल्मिक पाटीलचे नाव पुढे येताच त्याला ताब्यात घेण्याची तयारी सुरु करण्यात आली. आबा यास पकडले असून पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागण्यापुर्वी वाल्मिक यास ताब्यात घेणे गरजेचे होते. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता सुधाकर अंभोरे यांनी इतरांच्या मदतीने वाल्मिक रामकृष्ण पाटील यास शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.
शिक्षक किशोर पाटील कुंझरकर व दोघे हल्लेखोर एकमेकांना ओळखत नव्हते. केवळ दारु पिण्यास हटकल्यामुळे रागाच्या भरात दोघांनी शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना जिवे ठार करण्याचा दोघांचा उद्देश नसल्याचे त्यांनी पोलिस तपासात कबुल केले. शिक्षक किशोर पाटील यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडून गेली होती. त्यांच्या मृत्यूनंतर दोघांची दारुची नशा उतरली होती. शिक्षक किशोर पाटील यांच्या खिशातील पैशांचे पाकीट व मोबईल दोघांनी चोरुन नेल्याची कबुली दिली.
कुंझरकर यांना मारहाण होत असताना परिसरातील काही लोकांनी ही घटना पाहीली होती. त्यावेळी मदतीची याचना करण्यासाठी कुंझरकर यांनी आरोळ्या देखील ठोकल्या होत्या. मात्र कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. कुणी त्यांच्या मदतीला आले असते तर कदाचीत शिक्षक कुंझरकर यांचा जिव वाचला असता.
आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा वाढदिवस 18 डिसेंबर रोजी असतांना याच दिवशी त्यांच्या हल्लेखोरांचा तपास लागला हा देखील एक योगायोग म्हणावा लागेल. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, पोलिस अधिक्षक राकेश जाधव यांनी एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.
सहायक पोलिस निरिक्षक तुषार देवरे, पोलिस उप निरिक्षक रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अशोक महाजन, राजेंद्र पाटील, विजयसिंग पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, अनिल देशमुख, गोरखनाथ बागुल, अशरफ शेख, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनिल दामोदरे, राहुल पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, भगवान पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, नंदलाल पाटील, संतोष मायकल, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, दिपक शिंदे, पंकज शिंदे, सहायक फौजदार रमेश जाधव, पो.हे.कॉ. इद्रीस पठाण, राजेंद्र पवार, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, इशांत तडवी तसेच तांत्रीक मदतीसाठी सहायक फौजदार विजय पाटील, श्रीकृष्ण पटवर्धन, जयंत चौधरी, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रदिप पाटील, संदिप धनगर, रेखाचित्रकार योगेश सुतार आदींची मोलाची मदत झाली.