जळगाव: खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याच्या मोबदल्यात पंटरमार्फत आठशे रूपयांची लाच घेणारा पोलीस नाईक आबासाहेब भास्कर पाटील (44) याच्यासह त्याचा पंटर मोहन भिका गुजर (54) या दोघांना चार वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय.लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.
तक्रारदाराचे खाजगी प्रवासी वाहन आहे. चाळीसगावातील कॅप्टन कॉर्नर येथून मारोती ओमनी वाहनात ते प्रवासी घेत वाहतूक करत होते. दरम्यान पोलीस नाईक आबा पाटील यांनी तक्रारदारास मागील व चालू महिन्याचे असे एकूण आठशे रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. पैसे दिले नाही तर प्रवासी वाहतूक करु देणार नाही, तसेच वाहनावर कारवाई करण्याची धमकी दिलीहोती. तयाबाबत तक्रारदाराने 31 मार्च 2016 रोजी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. पंटर मोहन गुजर यांच्यासह पोलीस नाईक आबा पाटील यास रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तपास पूर्ण करुन तपास अधिकारी यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्या. पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता.या खटल्यात सरकारपक्षातर्फे तपासधिकारी, तक्रारदार , पंच तत्कालीन पोलीस अधीक्षक या चौघांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोघा आरोपींना शिक्षा सुनावली. यात आरोपी पोलीस कर्मचारी आबा पाटील यास लाच मागितल्याच्या कलमात तीन वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तर लाच स्विकारल्याच्या कलमात 4 वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच पंटर मोहन गुजर यास तीन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. भारती खडसे यांनी काम तर पैरवी अधिकारी अनिल सपकाळे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे केसवॉच सुनिल शिरसाठ यांनी काम पाहिले.