विवाहितेच्या रुपाचा दिपक झाला होता दिवाना ! तिघांनी खून करुन संपवला त्याचा ठावठिकाणा!!

जळगाव : विस वर्षाची विवाहीत कंगना (काल्पनिक नाव) ग्रामीण भागात तिच्या पतीसह रहात होती. तारुण्याच्या लाटेवर स्वार असलेली कंगना एका मुलाची आई देखील होती. जळगाव जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या रावेर तालुक्यात ती आपल्या पतीसह रहात होती. विवाहीत कंगनाचे रुप आणि वागणे एखाद्या कुमारीकेसमान होते.

कंगना रहात असलेल्या गावात दिपक भगवान सपकाळे हा चोवीस वर्षाचा तरुण देखील रहात होता. कंगनाच्या रुपाने घायाळ झालेला दिपक तिचा दिवाना झाला होता. त्याची चोरटी नजर नेहमीच कंगनाच्या रुपाकडे खिळून रहात असे. वास्तविक कंगना एक विवाहिता होती. तिला पतीरुपी समाजमान्य कुंपण लाभले होते. मात्र त्या कुंपणापलीकडून दिपकची भिरभिरती नजर कंगनाच्या रुपाचा ठाव घेत होती. काही फळे खुप उंच असतात. ती फळे सहजासहजी कुणाच्या हाती लागत नसतात. उंचावरील फळे बुद्धीच्या वापराने हस्तगत करावी लागतात हे दिपक जाणून होता. कंगनारुपी सौंदर्याचे फळ आपल्या सहज हाती कसे लागेल याचाच विचार दिपक मनाशी करत असे.  

एके दिवशी कंगना रामप्रहरी स्नानसंध्या अर्थात अंघोळ करत होती. ग्रामीण भाग म्हटला म्हणजे तेथील बाथरुम कमी अधिक प्रमाणात उघडे असतात. कंगनाच्या दिनचर्येचा आणि जिवनशैलीचा दांडगा अभ्यास असलेल्या दिपकने तिच्या अंघोळीचा प्रसंग आपल्या मोबाईल कॅमे-यात टिपला. ती स्नानसंध्या करत असतांना अचानक दिपकची भिरभिरती नजर तिच्याकडे गेली. त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या अंघोळीचा क्षण टिपण्यात त्याने अजिबात वेळ दवडला नाही. बस……. हा व्हिडीओ म्हणजे आपल्यासाठी हुंडी नाही तर बेअरर चेक झाला असे मनातल्या मनात म्हणत त्याने सुखद अनुभव घेतला.

गावातील दिपक आपल्या रुपावर कायम नजर ठेवून असल्याचे एव्हाना कंगनाच्या लक्षात आले होते. सुरुवातीला स्मित हास्य करुन तिच्यासमोरुन जाणारा दिपक आता भलताच डेअरिंगबाज झाला होता. तो तिच्याशी खुले आम बोलू लागला. बोलता बोलता त्याने तिला त्या व्हिडीओ बाबत देखील सांगण्याचे काम पुर्ण केले. आपला अंघोळीचा प्रसंग त्याने मोबाईल मधे कैद केला असल्याचे समजताच ती काही वेळ विचारमग्न झाली. हा व्हिडीओ व्हारयरल करण्याची गर्भित धमकी त्याने तिला दिली होती. त्यामुळे तिला त्याच्यासोबत बोलणे भाग पडत होते. त्या व्हिडीओची टांगती तलवार त्याने तिच्या डोक्यावर ठेवली होती. त्यामुळे हसतमुखाने परंतू नाईलाजाने ती त्याच्याशी संभाषण करत होती.

दिपकचे गावातील कंगनासोबत हसणे खिदळणे बघून त्याचे वडील भगवान सपकाळे यांना शंका आली होती. भगवान सपकाळे यांनी काळाची पावले ओळखून आपल्या मुलाला सावध केले. त्यांनी आपल्या मुलात झालेला बदल लक्षात घेतला. त्यांनी त्याला  वेळीच समज दिली. तुझ्या वागण्यात व बोलण्यात बदल झाल्याचे माझ्या लक्षात आले असून हे योग्य नाही असे भगवान सपकाळे यांनी मुलगा दिपक यास बजावले. मात्र आपल्या वडीलांच्या बोलण्याकडे दिपकने दुर्लक्ष केले.   

एके दिवशी कंगनाने आपल्या मनातील व्यथा तिच्या पतीजवळ कथन केली. तिने पतीला म्हटले की गावातील दिपक सपकाळे हा मला त्रास देत आहे. त्याने माझ्या नकळत मी अंघोळ करत असतांना एक व्हिडीओ काढला आहे. त्या व्हीडीओच्या बळावर तो मला शरीरसंबंध ठेवू देण्यास सक्ती करत आहे. तसे केले नाही तर तो अंघोळीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची व पर्यायाने बदनामीची भिती दाखवत आहे.

आपल्या पत्नीचा अंघोळ करतांना तयार केलेला व्हिडीओ गावातील दिपकजवळ असल्याचे समजताच कंगनाच्या पतीला राग आला. मात्र त्याने हा राग व्यक्त केला नाही. त्याने काही प्रमाणात बुद्धीचा वापर करत पत्नीला एक सल्ला दिला. त्याने पत्नी कंगनाला म्हटले की तु मुद्दाम गावातील दिपकसोबत प्रेमाचे नाटक सुरु ठेव. त्याला व्हिडीओ व्हायरल करण्यापासून थोपवून ठेव. पतीने दिलेल्या सल्ल्यानुसार कंगना त्या दिवसापासून दिपकसोबत गोड बोलू लागली. ती त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक करु लागली. रस्त्यात दिपक दिसला म्हणजे त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली. हा प्रकार दिपकच्या वडीलांच्या लक्षात आला. त्यांनी मुलगा दिपक यास वेळीच सावध केले. “बेटा तुझे हे वागणे बरे नव्हे” असे भगवान सपकाळे यांनी मुलगा दिपक यास समजावून सांगीतले. मात्र दिपकने वडीलांच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. त्याने डेअरींग करत विवाहित कंगनासोबत खुलेआम बोलणे सुरुच ठेवले. आपल्या मुलाची पावले चुकीच्या दिशेने पडत असल्याचे भगवान सपकाळे यांच्या लक्षात आले होते. दिपकला जाळ्यात अडकवण्यासाठी कंगनाच्या पतीने रचलेला तो एक सापळा होता.

दिपकला एकटे गाठून कायमची अद्दल घडवण्याचे नियोजन कंगनाच्या पतीने मनाशी केले होते. मात्र दिपक एकटा सापडत नव्हता. दरम्यानच्या काळात पतीच्या सल्ल्यानुसार दिपकसोबत प्रेमाचे नाटक पार पाडत होती. ती त्याला स्माईल देत प्रेमाचे नाटक करतच होती. विवाहीत कंगनाचा दिवाना झालेला दिपक मात्र हवेत उडत होता. आपल्याजवळ कंगनाचा व्हिडीओ म्हणजे जणू काही बेअरर चेक असल्याच्या थाटात तो वावरत होता. आपण केव्हाही संधी साधून तिचा  उपभोग घेवू शकतो असे त्याला वाटत होते. मात्र काही फळे ही खुप उंचावर असतात. ती फळे तोडण्यासाठी हात पुरत नसतो. दगड मारला तर नेम बसत नाही. नेम बसला तरी तुटत नाही अशी अवस्था या उंचावरील फळांची असते. चढाई केली तर तोल जावून पडून जखमी होण्याची देखील भिती असते. दरम्यानच्या काळात पतीच्या सल्ल्यानुसार कंगना स्माईलवर काम भागवून दिपकसोबत प्रेमाचे नाटक करत होती. त्याला एकटे गाठून जिवे ठार करण्याचे नियोजन कंगनाचा पती करत होता. मात्र तो एकटा सापडत नव्हता.

सरत्या 2020 या वर्षात 27 डिसेंबर रोजी कंगनाच्या माहेरी यावल तालुक्यातील एका नातेवाईक तरुणाचे लग्न होते. त्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी एक दिवस अगोदर 26 डिसेंबर रोजी कंगना पतीसोबत दुचाकीवर डबलसीट बसून आली होती. दिपक मात्र कंगनाला आपली प्रेयसी समजत होता. आपली प्रेयसी माहेरी गेल्याचे दिपकला माहिती होते. कंगनाला त्रास देणा-या दिपकला अद्दल घडवण्याची मोहीम कंगनाचा पती मनातल्या मनात आखत होता. त्याने मनातील नियोजन आणि खदखद सासरी दोघा शालकांजवळ कथन केली. कंगनाचा पती व दोघे शालक अशा तिघांनी मिळून दिपकचा गेम करण्याचे नियोजन केले.

कंगनाच्या माध्यमातून दिपकला एकटेच मध्यरात्री बोलावून त्याला या जगातून कायमचे हद्दपार करण्याचा प्लान तिघांनी आखला.  कंगनाच्या पतीने तिला तसे समजावून सांगीतले. त्यानुसार तिने तिच्या भावाच्या मोबाईलवरुन सायंकाळी सात वाजता दिपक यास फोन केला. रात्री अकरा वाजेनंतर तिने त्याला भेटण्यास बोलावले. कंगनाने तिच्या माहेरी केवळ आपल्याला व ते देखील रात्रीच्या वेळी बोलावल्याचे ऐकून दिपक मनोमन खुश झाला. आता ती आपल्याला संधी साधून शरीरसुख देणार या विचारानेच दिपक मनोमन खुश झाला. मात्र आपले वडील भगवान सपकाळे मध्यरात्री आपल्याला घराबाहेर जावू देणार नाही याची देखील दिपकला जाणीव होती. त्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा याबाबत त्याने विचार सुरु केला.

याकामी त्याने त्याचा जवळचा मित्र यज्ञेश सुर्वे यास हाताशी धरले. त्याने यज्ञेश यास एक कानमंत्र दिला. त्या कानमंत्रानुसार यज्ञेश रात्री ठिक आठ वाजता दिपकच्या घरी धापा टाकत टाकत आला. अगोदरच ठरल्यानुसार यज्ञेश याने दिपक यास खोटे खोटे सांगीतले की माझ्या मित्राच्या वडिलांचा अपघात झाला असून त्यांना पाहण्यासाठी आपल्याला तात्काळ जायचे आहे. खोटा अपघात व तो देखील रात्रीच्या वेळी झाला असल्याचे यज्ञेश याने सांगीतल्यामुळे दिपकच्या वडीलांनी त्याला यज्ञेशसोबत जावू दिले. अशा प्रकारे दिपकने यज्ञेशच्या मदतीने घरातून वडीलांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. आज आपल्याला कंगनासोबत सुख घेण्याची संधी मिळणार या विचारानेच तो मनातल्या मनात खुश होता. मात्र पुढे नियतीने काय वाढून ठेवले आहे हे त्याला माहीतीच नव्हते.

यज्ञेशच्या मदतीने खोटे बोलून दिपक घरातून बाहेर पडला. त्याने यज्ञेशला दुचाकीवर सोबत घेत अगोदर मस्कावद या गावी नेले. मस्कावद येथे गेल्यावर दिपकने त्याचा मित्र प्रशांत तायडे याला देखील सोबत घेतले. अशा प्रकारे तिघे मित्र एकत्र आल्यानंतर दिपकने आपल्या मनातील खरी गोष्ट दोघांजवळ कथन केली. दिपकने दुचाकीवरील दोघा मित्रांना सांगितले की माझे गावातील कंगनावर प्रेम असून ती आता तिच्या माहेरी गेली आहे. तिने मला तिच्या माहेरी बोलावले आहे. अशा प्रकारे बोलत बोलत तिघे मित्र सावदा  या गावी आले. सावदा येथे दिपकने दुचाकीत पेट्रोल भरले. कंगनाचा पुन्हा फोन येण्याची दिपक वाट बघत होता. तोवर दिपकने सोबतच्या दोघा मित्रांना कंगनाच्या माहेरी असलेल्या एका मित्राच्या जिमवर नेले. त्याचवेळी दिपक यास कंगनाचा फोन आला. दिपकच्या मोबाईलवर पलीकडून कंगनाचा फोन येताच दिपक मनातून हुरळून गेला. मात्र पलीकडून कंगनाने त्याला सांगितले की माझा भाऊ अजून घरीच आहे. तुम्ही परत घरी निघून जा. फोनवरील कंगनाचे बोलणे ऐकून इकडे दिपकचे मन उदास झाले. मोठ्या उत्साहाने स्फुर्ती घेवून तो इथपर्यंत कसाबसा आला होता. चौफेर उधळलेला दिपकचा अश्व परतीच्या मार्गाला जाण्याची तयारी करु लागला. पलीकडून कंगनाचा नकारात्मक सुर ऐकून दिपक नाराज झाला. मात्र ही कंगना व तिच्या पतीसह भावांची एक खेळी होती.

नाराज झालेला दिपक दोघा मित्रांसह परतीच्या मार्गाला लागला असतांना वाटेत कंगनाचा त्याला पुन्हा फोन आला. तिने पलीकडून त्याला म्हटले की तुम्ही मागे या. आता पुन्हा बोलावणे आल्यावर दिपकचा वारु पुन्हा उधळला. तो मनातल्या मनात पुन्हा एकवेळ खुश झाला. त्याने सोबतच्या दोघा मित्रांना दुचाकीवरुन वाटेत खाली उतरवून दिले. दिपकने प्रशांतच्या फोनवरुन कंगनाला फोन केला. त्याने तिला दहा मिनीटात येतो असे म्हणत तयार राहण्यास सांगीतले. दिपक आता एकटाच दुचाकीने तिच्या माहेरी जाण्यास निघाले. दरम्यान त्याचे दोघे मित्र यज्ञेश व प्रशांत त्याची वाट बघत रस्त्यात अंधारात चाचपडत बसून राहिले.

दिपक दहा मिनीटात येत असल्याचे नक्की झाल्यानंतर इकडे कंगनासह तिचा पती व दोघे भाऊ दिपकचा गेम करण्यासाठी सतर्क झाले. कंगनाचा पती व दोघे भाऊ असे तिघे जण खोलीत लाईट बंद करुन लपून बसले. कंगना घराच्या बाहेर एकटीच उभी राहीली. कंगना घराबाहेर एकटीच उभी असल्याचे बघून दिपकच्या मनात खुश झाला. आता कंगनाला भोगण्याची संधी मिळणार असे त्याला वाटले. मात्र ही त्याची फसवणूक होती.

कंगनाने दिपकला घरात जाण्याचा इशारा केला. दिपक आत जाताच कंगनाने घराचा दरवाजा बाहेरुन बंद करुन घेतला. कंगना बाहेर असतांना आत लपून बसलेल्या कंगनाच्या पती व दोघा भावांनी तयारीनिशी दिपकला पकडले. दिपक व त्याच्या शालकाने दिपकच्या गळ्यात सुती दोर टाकला. दोराचे एक टोक दिपकने व दुसरे टोक मोठ्या शालकाने आवळण्यास सुरुवात केली.  मात्र तो दोर सुटून गेला. दोर सुटल्यामुळे तिघांनी दिपकच्या अंगावर गोधडी टाकून त्याला मारण्याची तयारी सुरु केली. गोधडीखाली श्वास गुदमरल्यामुळे दिपकने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दिपकने आरडाओरड करु नये म्हणून कंगनाच्या पतीने त्याच्या डोक्यात तिन वेळा कु-हाड मारली. तिन वेळा कु-हाडीचे घाव बसल्यामुळे दिपक जागीच भान हरपून बेशुद्ध झाला. त्यानंतर कंगनाच्या पतीने चाकू बाहेर काढला. तो चाकू त्याने दिपकच्या गळ्यावर दोन वेळा चालवला. त्यानंतर तो चाकू त्याने गळ्यात खुपसूनच दिला. या सर्व थरारक प्रसंगानंतर दिपकचे जिवंत राहणे शक्यच नव्हते. तो रक्तबंबाळ होवून कोसळला होता. त्याने स्वत:हून मृत्यूच्या दिशेने वाटचाल केली होती.

कंगनाच्या पतीने कंगनाला दार उघडण्यास सांगितले. दार उघडल्यानंतर तो बाहेर आला. त्याने बाहेरुन एक पोते, सिमेंटचे तिन पोते व एक प्लास्टीकचा काळा कागद आणला. दिपकचा मृतदेह पोत्यात टाकण्यात आला. मात्र दिपकच्या शरीरातून सुरु असलेला रक्त प्रवाह थांबण्याचे नाव घेत नव्हता. त्याच्या रक्ताचा प्रवाह कसाही करुन थांबवण्यासाठी पोत्यांसह गोधड्यांचा वापर करण्यात आला. कसेबसे घरात पसरलेले रक्त कपड्याने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

त्यानंतर रातोरात गाते या गावी लावलेली ओमनी कार आणली गेली. त्या ओमनी गाडीत प्लास्टीकचा काळा कागद अंथरुन दिपकचा मृतदेह ठेवण्यात आला. कंगनाचा पती व त्याचा मोठा शालक असे दोघे जण व्हॅनमधे बसले. लहान अल्पवयीन शालकाने दिपकने आणलेली मोटार सायकल ताब्यात घेतली. त्यावेळी रात्रीचा पाऊन वाजला होता.  दिपकचा मृतदेह एखाद्या रेल्वे लाईनवर टाकून द्यायचा व तेथेच त्याची मोटार सायकल उभी करुन द्यायची असे सर्वांचे नियोजन होते. दिपकने दुचाकीवर येवून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करण्याचे त्यांनी नियोजन सुरु केले होते.

दरम्यान इकडे दिपकसोबत आलेले त्याचे दोघे मित्र यज्ञेश सुर्वे आणि प्रशांत तायडे कंटाळून गेले होते. दोघे जण दिपक परत येण्याची वाट बघत बसले होते. बराच वेळ झाला तरी दिपक परत येत नसल्यामुळे त्यांनी  दिपकला फोन लावला असता तो बंद येत  होता. त्यामुळे रात्री एक वाजता त्यांनी थेट कंगनाला फोन लावला असता पलीकडून कुणीतरी फोन उचलला. त्याने फोनवर सांगितले की आम्ही जळगावला जात आहोत तुम्ही परत निघून जा. अखेर यज्ञेश सुर्वे याने त्याच्या भावाला फोन लावला व घरुन दुचाकी मागवून घेतली. यज्ञेशच्या भावाने त्याच्या मित्रासह गाडीवर येवून कंटाळलेल्या यज्ञेश व प्रशांत या दोघांना गाठले. अशा प्रकारे चौचे मित्र एकाच मोटार सायकलवर बसून घरी परत गेले.

दरम्यान दिपकचा मृतदेह ओमनीद्वारे घेवून कंगनाचा पती व त्याचा मोठा शालक असे दोघे जण निघाले होते. दिपकने सोबत आणलेली दुचाकी घेवून कंगनाचा लहान अल्पवयीन भाऊ रात्रीच्या वेळी निघाला होता. पुढे पुढे ओमनी व त्यामागे मोटार सायकलवर कंगनाचा लहान भाऊ अशा पद्धतीने सर्वजण दिपकच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघाले.   

महामार्गावरील जळगाव खुर्द फाट्यावरील रेल्वे उड्डानपुलाजवळ दिपकचा मृतदेह आणला गेला. तेथेच त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. दिपकच्या खिशातील मोबाईल आवर्जून काढून घेण्यात आला. त्याला गुंडाळलेली गोधडी व पोते देखील काढून घेण्यात आले.  त्यावेळी रात्रीचा दिड वाजून गेला होता. त्यावेळी भुसावळ कडून जळगावच्या दिशेने कोणतीतरी भरधाव ट्रेन त्यांना येतांना दिसली. ट्रेन येत असल्याचे दिसताच तिघांनी मिळून दिपकचा मृतदेह रेल्वे लाईनवर घाईघाईत ठेवण्यात आला. ट्रेन तेथून जाण्यापुर्वीच तिघे जण पटकन बाजूला  उभे राहिले. भरधाव ट्रेनखाली दिपकचा मृतदेह चिरडला गेला. त्यात दिपकचा उजवा हात व उजवा पाय कापला गेला. कंगनाच्या अल्पवयीन भावाने चालवत आणलेली दिपकची मोटारसायकल तेथेच झाडाझुडूपात लावून देण्यात आली. अशा प्रकारे दिपकने मोटारसायकलने येवून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर सर्व जण ओमनीने आपल्या घरी यावल तालुक्यात निघून गेले.

घरी येतांना वाटेत दिपकला मारण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू, त्याचा मोबाईल, रक्ताने माखलेली गोधडी व पोते तसेच प्लास्टीकचा कागद अशा सर्व वस्तू तापी नदीच्या पाण्यात फेकून देण्यात आल्या. गाडीच्या आतील बाजूस लागलेले रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

दुस-या दिवशी 27 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती रेल्वे प्रशासनास मिळाली. याप्रकरणी मनोजकुमार वर्मा (उप स्टेशन प्रबंधक भादली रेल्वे स्टेशन) यांनी दिलेल्या खबरीनुसार नशिराबाद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. सदर नोंद सीआरपीसी 174 नुसार 38/20 या क्रमांकाने घेण्यात आली. त्यानंतर लागलीच नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश चव्हाण यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी भेट देत मृतदेहावर इंक्वेस्ट पंचनामा  केला. मयत दिपक हा पोलिसांसह सर्वांच्या दृष्टीने अनोळखी होता. हा मृतदेह कुणाचा आहे? हा घातपात आहे की आत्महत्या आहे या सर्व बाबींचा उलगडा होणे गरजेचे होते. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश चव्हाण यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला. 

जळगाव खुर्द शिवारात रेल्वे ट्रॅक परिसरात मोटरसायकल (एमपी 09 बीजी 4269) काटेरी झाडाझुडपात पोलिस पथकाला आढळून आली. या मोटार सायकलच्या मदतीने पुढील तपासाला दिशा मिळणार होती. पोलिस पथकाने या मोटार सायकलच्या क्रमाकांवरुन तिच्या मुळ मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तपासाअंती ती मोटारसायकल आशिष सुधाकर (रा. इंदोर मध्य प्रदेश) याची असल्याचे निष्पन्न झाले. आशिष सुधाकर याने ती मोटार सायकल अनिल फुटकरे यास दिली होती. अनिल फुटकरे याने ती गाडी गहाण ठेवून नीलेश कोळी यास वापरण्यासाठी दिली होती. पोलीस हवालदार विजय पाटील यांनी निलेश कोळी याची भेट घेत त्याला मयताचा फोटो दाखवला. मयताचा फोटो दाखवल्यानंतर त्याने तो ओळखला. हा फोटो आपला शालक दिपक भगवान सपकाळे याचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान रात्री घरातून गेलेला दिपक सकाळपर्यंत घरी परत आला नाही म्हणून त्याचे वडील भगवान सपकाळे हवालदिल झाले होते. दिपक यास रात्री बोलावण्यास आलेल्या यज्ञेश सुर्वे याची त्यांनी चौकशी केली. त्यावेळी यज्ञेश सुर्वे याने त्यांना रात्रीचा सर्व घटनाक्रम कथन केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार भगवान सपकाळे यांनी कंगनाचे माहेर गाठत तिच्या पतीला विचारपुस केली. तिच्या पतीने त्यांना खोटेच सांगितले की दिपक मला रात्री दहा वाजता पानटपरीवर भेटला होता. मात्र त्यानंतर तो कुठे गेला हे मला माहिती नाही.

 त्यानंतर कुणातरी तरुणाचा मृतदेह नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीत रेल्वे लाईनवर मिळून आला असल्याची माहिती त्यांना समजली. तो तरुण कदाचीत आपला मुलगा असू शकतो असे लक्षात घेत त्यांनी तो मृतदेह पाहण्यासाठी धाव घेतली. तो मृतदेह आपला मुलगा दिपक याचा असल्याची त्यांची खात्री झाली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली मयत दिपकच्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डीटेल्स विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांनी काढण्यास सुरुवात केली. दिपक कुणाकुणाच्या संपर्कात होता हे जाणून घेण्यासाठी सर्व डाटा संकलीत करण्यात आला. कॉल डिटेल्स नुसार मयत दिपक हा सर्वाधिक वेळा संबंधीत विवाहितेसोबत बोलला असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शेवटचा मोबाईल बंद होण्यापुर्वी देखील तो तिच्याशीच बोलला असल्याचे तांत्रीक तपासात पुढे आले.

या माहितीच्या आधारे पोलिस नशीराबाद पोलिसांच्या पथकाने थेट विवाहित कंगनाचे यावल तालुक्यातील माहेर गाठले. नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश चव्हाण यांनी सर्वप्रथम विवाहितेची चौकशी केली. तिने दिलेल्या माहितीनुसार सर्व घटनाक्रम समोर आला.  या प्रकरणी मयत दिपक सपकाळे याचे वडील भगवान रघुनाथ सपकाळे यांनी नशिराबाद पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. सदर फिर्याद भाग 5 गु.र.न. 215/20 भा.द.वि. 302, 201, 120 ब नुसार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी कंगनासह तिचा पती व दोघा भावांना ( एक अल्पवयीन) ताब्यात घेत अटक करण्यात आली. मयत दिपक भगवान सपकाळे याने विवाहितेचे अंघोळ करतांना चित्रीकरण केले होते. त्या चित्रीकरणाच्या बळावर तो तिला बदनामीचा धाक दाखवून शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा बाळगत होता.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुखे, प्रवीण ढाके, किरण बाविस्कर, लीना लोखंडे, रवींद्र इंधाटे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, विजय पाटील, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, राजेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, इश्वर चव्हाण, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदींनी खुनाचा उलगडा करण्याकामी परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश चव्हाण व त्यांचे सहकारी प्रविण ढाके करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here