नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे किंवा दोघांनी एकमेकांचा सहवास लाभण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांना शिक्षा देणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
एका खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काही महत्वाची निरिक्षणे नोंदवली आहेत. तुम्ही एखाद्याला प्रेमात पडल्याबद्दल शिक्षा करु शकत नसल्याचे मत शरद बोबडे यांनी व्यक्त केले आहे. जर शिक्षा केली तर तो गंभीर स्वरुपाचा गुन्हा ठरेल, असंही त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय घटनापीठासमोर एका गावातील खाप पंचायतमधील अकरा सदस्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्या गावातील एक दलित तरुण एका तरुणीसोबत पळून गेला होता. दोघांना पळून जाण्यास त्या तरुणाच्या चुलतभावाने मदत केली होती. या तिघांनाही फाशी देण्याचा प्रकार गावातील पंचायत सदस्यांनी केला होता.
पळून गेलेल्या तरुण आणि तरुणीने काही दिवसांनी गावात परत येण्याचे ठरवले. गावक-यांचा राग निवळला असेल असे त्यांना वाटले होते. मात्र गावात आल्यावर गावक-यांनी त्यांना मारहाण केली. दोघांना पळूण जाण्यास मदत करणा-या तरुणाला देखील गावक-यांनी मारहाण केली. त्यानंतर तिघांना झाडाला लटकावून फाशी देण्यात आली. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्याच्या मेहराना गावात सन 1991 मधे ही घटना घडली होती. या प्रकरणी अकरा जणांना अटक झाली होती. त्यातील आठ जणांना अलाहाबाद न्यायालयाने सन 2016 मधे फाशीची शिक्षा ठोठावली होती. तसेच इतरांना आजीवन तुरुंगवास सुनावला होता.