मुंबई : आज सकाळीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांच्या भेटीला त्यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर सपत्निक दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथराव खडसे हे देखील आजच ईडीच्या कार्यालयात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा विषय देखील चर्चेत आहे.
संजय राऊत यांच्या पत्नीलादेखील ईडीची नोटीस मिळाली आहे. प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांच्या पत्नीने घर घेण्यासाठी 50 लाख रुपये उधार घेतले होते. ते पैसे त्यांनी परत दिल्याची माहिती ईडीला देण्यात आली आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की ते पैसे परत दिले असले तरी ईडीला त्याचा हिशेब द्यावा लागणार आहे.
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसे यांची चौकशी गेल्या महिनाभरापासून प्रलंबित आहे. कोरोना क्वारंटाईनमुळे एकनाथराव खडसे यांनी 14 दिवसांचा कालावधी वाढवून घेतला होता. तो कालावधी आज संपल्यामुळे ईडीने त्यांना चौकशीकामी बोलावले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा विषय हा त्यांचा व्यक्तिगत विषय असून तो त्यांनीच सोडवला पाहिजे असे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.