जळगाव
: विवाहीत करिश्मा (काल्पनिक नाव) रुपवान
होती. तिच्या पतीला दारु पिण्याचे भारी व्यसन होते. दारुचा नाद पुर्ण करण्यासाठी तिचा
पती पैसे उधळत असे. पतीच्या दारु पिण्याच्या व्यसनाला लगाम लागत नसल्याने करिश्मा
पार वैतागली होती. दारुड्या नव-याला पत्नीच्या रुपात करिश्मा सारखी रुपमती लाभली
होती. करिश्माचे देखणे रुप बघून घराजवळ राहणारा अविवाहीत गुलाब तिचा दिवाना झाला
होता.
गुलाब आणि
करिश्माचे घर एकाच गावात हाकेच्या अंतरावर होते. गुलाबची नजर करिश्मावर खिळून रहात
असे. एके दिवशी गुलाबला राहवले गेले नाही. त्याने आपला मोर्चा थेट करिश्माच्या घरात
अनाधिकारे नेला. अनाधिकारे घरात प्रवेश करत त्याने करिश्मासोबत गैरवर्तन अर्थात तिचा
विनयभंग केला. गुलाबच्या या कृतीमुळे करिश्माच्या मनात लज्जा निर्माण झाली होती. तिने हा प्रकार तिच्या पतीच्या कानावर घातला.
दारुच्या नशेत घरी आल्यावर तिच्या पतीने गुलाब यास काटेरी बोल सुनावले.
हा प्रकार
करिश्माचे सासु सासरे व दिराला देखील समजला. त्यांनी करिश्माची बाजू घेत गुलाबसह
त्याच्या आईवडीलांना शिवीगाळ सुरु केली. गुलाबची बाजू सावरण्यासाठी त्याचे आई – वडील
व भाऊ एकत्र आले. त्यांनी गुलाबची बाजू सावरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.
विनयभंगाच्या
त्या घटनेपासून गुलाब व करिश्माचा पती या दोघात वितुष्ट निर्माण झाले व संघर्षाला
सुरुवात झाली. या प्रकरणी करिश्माने गुलाबच्या विरोधात यावल पोलिस स्टेशनला सन
2017 मधे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. भाग 5 गु.र.न. 102/17 भा.द.वि. 354 कलमान्वये
यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर न्यायप्रविष्ठ गुन्हयात न्यायालयाने
गुलाब यास तिन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व
पाच हजार रुपये दंड ठोठावला. दोन वर्ष न्यायालयीन कैदेत गेल्यानंतर गुलाब सन
2019 मधे जामिनावर सुटून बाहेर आला. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो आपल्या गावी परत आला.
त्याच्या घरापासून करिश्माचे घर हाकेच्या अंतरावर होते. त्यामुळे पुन्हा करिश्माचा
पती व गुलाब यांना एकमेकाचा चेहरा बघण्याची वेळ आली. करिश्मासह तिचा पती आणि गुलाब
हे दोघे एकमेकांच्या समोर येवू लागले. गुलाबला बघून करिश्माला संकोचल्यासारखे वाटत
होते. गुलाब समोर दिसला म्हणजे करिश्माच्या
पतीचा तिळपापड होत असे. गुलाबला खाऊ का गिळू अशी त्याच्या मनाची अवस्था होत असे. दारुच्या
नशेत करिश्माचा पती गुलाब यास शिवीगाळ करत असे. आपल्या पत्नीचा गुलाबने केलेला विनयभंग
त्याला सतत आठवत असे. गेल्या तिन ते चार वर्षापुर्वी झालेल्या या वादाचे पडसाद कमी
अधिक प्रमाणात उमटत होते. सन 2017 सालापासून एकाच गावात हाकेच्या अंतरावर राहणारे हे
दोन्ही परिवार जणू काही एकमेकांचे वैरी झाले होते.
दिवसामागून
दिवस जात होते. भिंतीवरील दिनदर्शिकेच्या तारखा दररोज बदलत होत्या. आता वाद नको
असे गुलाबने मनाशी म्हणत त्याने तो रहात असलेले गाव सोडण्याचा निर्णय घेतला. आता करिश्मा
व तिच्या पतीचा चेहरा बघायचा नाही आणि वादही वाढवून घ्यायचा नाही असे गुलाबने मनाशी
ठरवले. आपल्या मामाच्या गावी शिरसोली येथे रहायला जाण्याचे व जळगावला कामधंदा
करण्याचे त्याने मनाशी ठरवले. तो मामाच्या गावी शिरसोली येथे राहण्यासाठी आला.
शिरसोली येथे तो काही वेळ सलूनचे काम करु लागला. उर्वरित वेळेत जळगावला खासगी नोकरी करु लागला. अशा प्रकारे गुलाब
आपल्या कामधंदयाला लागला.
दरम्यानच्या
काळात गुलाबचा मोठा भाऊ सुरत येथे नोकरी निमित्त स्थायिक झाला. गुलाबच्या बहिणीचे देखील
दरम्यानच्या काळात लग्न झाले. त्यामुळे गावात केवळ गुलाबचे आई वडील असे दोघेच जण रहात
होते. अशा प्रकारे हा तिन वर्षाचा अध्याय आता संपला होता. मात्र गुलाबने गाव सोडून
दिले तरी देखील करिश्माचा पती व तिचे सासू सासरे गुलाबच्या आई वडीलांकडे खुनशी
नजरेने बघत होते. ते दोघांसोबत बघून घेण्याची भाषा करत होते.
9 मे
2020 चा तो दिवस उजाडला. ग्रामीण भागात विज पुरवठा वारंवार खंडीत होत असतो. उन्हाळ्याचे
दिवस असल्यामुळे साहजिकच ग्रामीण भागात उकाडा असहय होत असतो. बरेच ग्रामस्थ झाडाच्या
सावलीत खाटेवर निजतात. 9
मे च्या दुपारी गुलाबचे वडील त्यांच्या घरासमोर असलेल्या
बदामाच्या झाडाखाली खाटेवर निजले होते. त्याठिकाणी अचानक करिश्माचा पती त्याच्या ताब्यातील
बैलगाडी सुसाट वेगाने घेवून आला. पत्नीच्या विनयभंगाचा राग त्याच्या मनात होताच.
करिश्माच्या
पतीने सुसाट वेगाने आणलेल्या बैलगाडीच्या चाकाचा हुक गुलाबचे वडील झोपलेल्या खाटेत
दुर्दैवाने अडकला. त्यामुळे ते खाटेसह जवळपास 15 ते 20 फुट फरफटत गेले व जखमी देखील झाले. दरम्यान त्या
खाटीचा एक पाय तुटला व ते जमीनीवर पडले. काही कळण्याच्या आत झालेल्या या संतापजनक प्रकारामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात राग आला. त्यांनी
करिश्माच्या पतीला ओरडून जाब विचारला. त्यावर तेवढ्याच मोठ्या आवाजात त्याने प्रतिप्रश्न
केला की तुला तुझी खाट बाजुला टाकून झोपता येत नाही का? रस्त्यात का झोपतो? आधीच अर्धमेल्या अवस्थेतील गुलाबच्या वडीलांना करिश्माच्या
पतीने चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दोघांचे
कडाक्याचे भांडण होत असल्याचे समजताच गुलाबची आई तेथे धावत आली. पतीला वाचवण्यासाठी
ती मधे पडली. दरम्यान या भांडणाचा आवाज ऐकून करिश्मासह तिचे सासु सासरे व दिर असे सर्व
जण धावतच बाहेर आले. त्यांनी गुलाबच्या आई वडीलांना शिवीगाळ व मारहाण करण्यास
सुरुवात केली.
आता यांचे खुप झाले, आता यांना आज ठार मारुया असे म्हणत सर्वांनी दोघा
पती पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी छातीवर, पोटावर, तोंडावर मारहाण सुरु केली. दोघा पती पत्नीला जिवे ठार करण्याची धमकी देत हा मारहाणीचा
प्रकार सुरुच होता.
या भांडणाचा
आवाज ऐकून गल्लीत राहणारे इतर रहिवासी धावत आले. त्यांनी गुलाबच्या आई वडीलांची
हल्लेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. या मारहाणीनंतर काही वेळाने सर्व जण
आपाआपल्या घरी निघून गेले. गुलाबच्या आई वडीलांनी गुलाबसह त्याच्या मामाला बोलावून
घेतले. चौघांनी मिळून यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे ठरवले. चौघे जण यावल
पोलिस स्टेशनला करिश्माच्या पतीसह इतरांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यास आले. तक्रार देत असतांना जखमी गुलाबच्या आईला भोवळ येवून
ती जमीनीवर कोसळली. गुलाबसह तिघांनी तिला लागलीच वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात
दाखल केले.
दरम्यान गुलाबच्या आईचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले. गुलाबच्या आईच्या मृत्यूस कारणीभुत असलेल्या
पाचही जणांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गु.र.न.80/20 भा.द.वि. 302, 143, 323, 504, 506, 188 सह मुंबई
पोलिस कायदा कलम 135 चे उल्लंघन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील
सर्व पाचही संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायधिश
डी.जी. जगताप यांनी पाचही संशयितांना १४ मे पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांनी कामकाज पाहिले. या गुन्हयाचा
तपास यावल पोलिस स्टेशनचे पो.नि. अरूण धनवडे व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक विनोद
खंडबहाळे व हे.कॉ. संजय तायडे करत आहेत. ( या कथेतील करिश्मा हे नाव
काल्पनिक आहे)