मटका किंग रतन खत्री

महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधीपासून या राज्यात सट्ट्याचे  अड्डे होते असे म्हटले जाते. आकड्यावर सट्टा लावण्याचा प्रकार भारतात लोकप्रिय करणारे मटका किंग रतन खत्री यांचे दहा मे च्या सकाळी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत ते आपल्या परिवारासह रहात होते.या ठिकाणी त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला.

रतन खत्री हे मुळचे पाकिस्तानच्या कराची येथील रहिवासी होते. सिंधी समाजाचे रतन खत्री हे वयाच्या दहाव्या वर्षी भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान भारतात स्थायीक झाले. कल्याण मटक्याचे कल्याण भगत यांच्याकडे त्यांनी काही दिवस काम केले. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी वरळी मटका सुरु केला. त्यांचा रतन मटका फार लोकप्रिय झाला.ओपन आणी क्लोज असे दिवसातून दोन वेळा मटक्याचे आकडे निघत होते. काढलेला मटक्याचा आकडा तिन मिनिटात देशभरात पोहोचत असे. त्यावेळी लॅंडलाईनचे काळ्या रंगाचे वजनाने जड असलेले फोन वापरले जात होते.विविध ठिकाणी फोन लावण्यापुर्वी त्याकाळी ट्रंक कॉल बुक करावा लागत असे.जाहीर झालेला आकडा देशात ठिकठिकाणी बुकींपर्यंत प्रसारित करण्यासाठी त्याकाळातील दुरसंचार विभागाची मोठी मदत होत असे.त्या तिन मिनिटाच्या  काळात सामान्य जनतेचे ट्रंक कॉल सहजासहजी लागतच नव्हते. देशात बुकींचे जाळे पसरवून खत्री यांनी 1960 पासून मटका व्यवसाय नावारुपाला आणला.
रतन खत्री नावाच्या अवलियाने सट्टयाच्या अवैध धंद्यात एक आगळी वेगळी दुनिया निर्माण केली. सट्टयाच्या अवैध धंद्यात रतन खत्री म्हणजे  “बस नाम ही काफी है”  अशी जादू निर्माण झाली. आजच्या बाजारु दुनीयेत “विश्वास” आणि “परंपरा”  या घटकांचा प्रचार आणी वापर करुन मालाची विक्री  केली जाते. या व्यवहारात बेमालुमपणे फसवणुकीचे मटेरियल वापरले जात असल्याचे बोलले जाते. परंतु तशाही परिस्थितीत रतन खत्री या व्यावसायीकाने केवळ एका चिटो-यावर रोखीने उलाढाल करणारा अवैध धंदा सजवला, फुलवला आणि वाढवला. एखाद्या शेटजीचा लाखो रुपयांचा विस सेंटीमिटर लांबीचा चेक बाऊंस होवू शकतो. मात्र मटका बुकीने दोन बोटांच्या चिटो-यावर लिहून दिलेला आकडा लागला म्हणजे परतावा मिळालाच म्हणून समजा. चिठ्ठीधारकाला रात्रीच किंवा दुस-या दिवशी सकाळी बक्षीसाची रक्कम हमखास मिळणारच हे या उद्योगाचे गमक म्हटले जाते. सट्टयाचा धंदा कितीही अवैध असला तरी या दोन नंबरच्या धंद्यातही इमानदारीचा खेळ चालतो हेच रतन खत्री यांनी जगाला दाखवून दिले. त्यामुळे आकडा बुक करतांना स्पॉटवर कोणत्याही नावाचा बुकी असला तरी हा धंदा अलिखीत इमानदारीने चालतो हे खेळणा-यांना माहीत असते.
सट्टयाच्या चिटोरीवर एक रुपयाची जोडी लागल्यास चिठ्ठी धारकास 80 रुपये विनाविलंब देण्याची व्यवस्था या धंद्यात राबवण्यात आली. संध्याकाळ नंतर साधारण रात्री नऊ वाजता ओपनचा एक आकडा आणि रात्री बारा वाजता येणारा क्लोजचा एक आकडा मिळून होणारी दोन अंकाची जोडी एका रुपयास 80 रुपयांचा परतावा देवून जाते. ओपन जेवण करु देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही असे लोक पुर्वी गमतीने म्हणत असत. प्रत्येक गावागावात शेकडो सट्टा अड्ड्यावर हजारो मटका बुकी आकडे नोंदवून घेत. शेकडो बेरोजगार देखील या धंद्यात रोजी रोटी कमवण्यात नशिब आजमावत असत. हजारो लाखो शेतमजूर, गोरगरीब, निरक्षर व कमी शिकलेले लोक देखील एक ते शंभर रुपयांपर्यंतचे आकडे लावून सकाळ होण्याची वाट बघत असत. रुपयाची जोडी येताच 80 रुपये, चौकडी लागताच 2500 रुपये, तिन आकड्यांचा परेलचा रेट वेगळा, अशा पद्धतीने सट्ट्याचा अवैध धंदा गेल्या सुमारे 80 वर्षापासून लपूनछपून का होईना सुरु असल्याचे म्हटले जात आहे. हा धंदा व्यवस्थित सुरु राहण्यासाठी संबंधीत यंत्रणेस हफ्त्याच्या रुपात प्रेमाची देवाण घेवाण सुरु असते असे म्हणतात. 
1940 ते 1950 पर्यंत लंडन मधे कॉटन खरेदीचा बाजार भाव मध्य रात्री जाहीर होत असे. त्या कॉटन बाजारभावाचे आकडे दगडी पाटीवर लिहिण्याची पद्धत रुढ होती असे जुने लोक सांगतात. रतन खत्री याने तीच पद्धत स्वत: काढलेला आकडा जाहीर करण्यासाठी वापरली. सट्टयाच्या अवैध दुनीयेचे आकर्षण पैसा मिळवू पाहणा-या गरीब जनतेसह संबंधीत यंत्रणेला व सिने निर्मात्यांना देखील आहे. सट्ट्याचा आकडा कसा निघतो हे दाखवणारा “धर्मात्मा” नामक सिनेमा काही वर्षापुर्वी गाजला होता. सट्टा मटका अड्ड्याभोवती लाखो करोडो रुपयांचे अर्थकारण फिरत असते. विजेत्यांना केवळ दहा टक्के रक्कम वितरीत करुन नव्वद टक्के रक्कम हडप करण्याचा दुसरा खेळ वरिष्ठ पातळीवर खेळला जातो असे म्हणतात. हा नव्वद टक्क्याचा माल पचवण्यासाठी संबंधीत यंत्रणेची हफ्तेबाजी, गावपुढारी, सरपंच, आमदार, नामदार यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा बॅनर्सचा धुमधडाका लावला जातो.
राज्यातील विविध जिल्हयात प्रत्येक गावागावातून सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गहू, तांदुळ वाटपासह समाजसेवेचे व्रत म्हणवून घेणारे कार्यकर्ते वृत्तपत्रात फोटो सेशनचा पाऊस पाडत आहे. या फोटो सेशनमधील बहुसंख्य भाऊसाहेब, दादासाहेब, कार्यसम्राट दानशुरांचे छुपे कार्य पाहिले तर त्यात सट्टा, जुगार, वाळू अड्ड्याशी काही टक्के मंडळी गुंतलेली दिसते. यापैकी काही समाजसेवक म्हणून वावरणारे संबंधीत यंत्रणेसोबत मैत्रीचे संबंध ठेवून आपल्या भागीदारांना सरंक्षण पुरवण्यात गुंतलेले दिसून येतात. अशाच काही मंडळींच्या सट्टा अड्ड्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना मोकळे रान ठेवण्याची मागणी केली जाते. त्यासाठी प्रसंगी राजकीय पक्षाच्या किंवा राजकीय नावाशी मिळत्या जुळत्या रिपब्लिकन, बहुजन, अल्पसंख्यांक, विकास आघाडी, मोर्चा अशा बॅनर्सवर विभाग प्रमुख, जिल्हा संघटक म्हणून मिरवणा-यांची फौज दिसून येत आहे. मध्यंतरी आर.आर.आबा  पाटील मंत्री असतांनाच्या काळात सांगली सातारा भागात पुढा-यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची देखील प्रसिद्धी एका जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केली होती. तेव्हा या प्रकाराचा पोलिस अधिका-यास जाब विचारा म्हणून कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. त्यावर खुलासा म्हणून आम्ही कोणत्याही समाजसेवकाची बदनामी करत नसून समाजसेवक म्हणून बॅनर्सवर झळकणा-यांचे पोलिस रेकॉर्डनुसार गुन्हेगारीचा तपशील देत असल्याचे उत्तर देण्यात आले होते. अर्थात असे खमके उत्तर गुन्हेगारी वृत्तीच्या तोंडावर फेकून मारण्यासाठी पोलिस अधिक्षक देखील तेवढाच खमक्या असावा लागतो.
आता तर दारु पिणारेदेखील कोरोना योद्धा म्हणून मानांकन मागत असल्याचे बोलले जात आहे. लोक हजारो कोटींची दारु पिवून हजारो कोटीचा कर शासनाला देतात. त्यासाठी दारु पिणा-यांना पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करायचा का? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील पंधरा कोटी जनतेवर सोपवता येईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here