यवतमाळ – पांढरकवडा : वीज महावितरण कंपनीच्या लेखापालास मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणणा-या पांढरकवडा येथील बीजेपीचे माजी आमदार राजू तोडसाम यांना न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाने देखील कायम ठेवली. त्यामुळे माजी आमदार तोडसाम यांची यवतमाळ जेलमधे रवानगी झाली आहे.
मरकाम नामक व्यक्तीला विज बिल जास्त आले म्हणून तत्कालीन आमदार राजु तोडसाम 17 डिसेंबर 2013 रोजी पांढरकवडा महावितरण कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी लेखापाल विलास आकोट यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती.
विलास आकोट यांच्या फिर्यादीनुसार पांढरकवडा पोलिसांनी भा.द.वि. कलम 294, 352, 353, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस निरिक्षक संजय खंदाडे यांनी तपासाअंती चार्ज शीट दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश मोरे यांनी दहा साक्षीदारांची तपासणी केली. यापैकी एक विज कर्मचारी असलेला साक्षीदार फितुर निघाला.
पांढरकवडा प्रथम श्रेणी न्यायालयाने 27 नोव्हेंबर 2015 रोजी माजी आमदार राजू तोडसाम यांना दोषी ठरवले. त्यांना कलम 294 अंतर्गत तीन महिने साध्या कारावासासह दहा हजार रुपये दंडाची तसेच कलम 352 नुसार तीन महिने कारावास अधिक पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला तत्कालीन आमदार तोडसाम यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यावर स्थगनादेश मिळवण्यात आला. पाच वर्षानंतर या खटल्याचा निकाल जाहीर झाला. गुरुवार 21 जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. नाईकवाड यांनी प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल जैसे थे ठेवला. न्यायालयाच्या समक्ष हजर असलेल्या माजी आमदार राजू तोडसाम यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. ॲड. गणेश धात्रक यांनी तोडसाम यांच्या बाजूने न्यायालयीन कामकाज पाहिले.