पुणे : पुर्वी लोक जेलमधे जाण्याच्या तयारीने जेल भरो आंदोलनात सहभाग घेत होते. पोलिस त्यांना अटक केल्यानंतर सोडून देत होते. मात्र आता जेल यात्रा हा नवा प्रकार समोर येत आहे. त्याला जेल फिरो आंदोलन म्हणता यईल. लोक महाबळेश्वर आणि लोणावळा अशा ठिकाणी फिरुन आल्याचे सांगतात. मात्र आता जेलमधे जावून आल्याचे सांगणार आहेत. जेलमधे जावून येणे म्हणजे त्यासाठी गुन्हा करण्याची मुळीच त्गरज नाही. जेलयात्रा हा पर्यटनासाठी एक नवा मार्ग आहे.
महाराष्ट्रात कारागृह पर्यटन ही एक नवी संकल्पना आणली गेली आहे. या संकल्पनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी पुणे येथील येरवडा जेलपासून करण्यात आला. यावेळी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री बोलत होते. पुणे येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई आदींची उपस्थिती होती. गोंदिया येथून गृहमंत्री अनिल देशमुख दृरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.