चंदीगड : पतीचा पगार वाढल्यानंतर पत्नीदेखील पोटगीची रक्कम वाढवून मिळण्यास पात्र असल्याचे पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणी म्हटले आहे. पत्नीला मिळणारी पोटगी 20 हजाराहून 28 हजारापर्यंत केल्याच्या निर्णयाला पंजाब व हरीयाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणातील वैवाहीक वादाच्या संदर्भात म्हटले आहे. पंचकुला येथील वरुण जागोटा यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत हा निर्णय दिला आहे.
कौटूंबीक न्यायालयाकडून 5 मार्च रोजी देण्यात आलेल्या आदेशाविरुद्ध वरुण जागोटा यांनी याचीका दाखल केली होती. याचिकाकर्ते जागोटा यांचा पगार 95 हजारावरुन 1 लाख 14 हजार झाल्याचे कौटूंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालात नमुद केले होते. मात्र सर्व वजावट केल्यानंतर 92175 एवढा पगार मिळत असल्याचे याचिकाकर्ते जागोटा यांचे म्हणणे होते. 28 हजाराची पोटगी देण्याबाबत याचिकाकर्त्याने प्रश्न उपस्थित केला होता. मात्र सदर याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
पतीच्या वेतनात वाढ झाली असतांना पत्नीच्या घरभाड्यात देखील 1500 रुपयांनी वाढ झाल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. सर्व बाजूने विचार करत देण्यात आलेला निर्णय योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.