अमळनेर : अमळनेर बाजार समितीवर नऊ शासन नियुक्त प्रशासकांमध्ये मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा बँक संचालीका सौ. तिलोत्तमा पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्या सभापती पदावर आरूढ होणार आहेत. याबाबत सौ. पाटील यांनी सांगीतले की तशा आशयाचे नियक्तीचे आदेश जिल्हा उप निबंधकांनी सहाय्यक उप निबंधकांना दिले आहेत. ते पत्र 16 रोजी बाजार समितीला प्राप्त होईल. त्यानंतर सहाय्यक उपनिबंधक तथा वर्तमान बाजार समिती प्रशासकांकडून पदभार घेतला जाईल. दोन दिवस आ. अनिल पाटील बाहेरगांवी आहेत. त्यामुळे 19 रोजी बाजार समितीत हा कार्यक्रम होईल. बाजार समितीवर निवडून आलेल्या संचालकांएवढाच सर्वाधिकार या प्रशासक मंडळाला राहील.
स्वातंत्र्यानंतर साठ वर्षात प्रथमच एका महिलेला सभापतीपदाचा कारभार मिळणार आहे. येथील बाजार समितीवर तालुक्यातील नऊ जणांची प्रशासकीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यास राज्य शासनाच्या सहकार व वस्रोद्योग मंडळाने मंजूरी दिली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र बाजार समितीला मिळाले आहे. या नऊ जणांमध्ये 5 रा. कॉ. चे व प्रत्येकी 2 सेना व कॉंग्रेसच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सदस्यांमध्ये जिल्हा बँक संचालीका सौ. तिलोत्तमा पाटील, भागवत सुर्यवंशी, विजय काशीनाथ पाटील, संभाजी लोटन पाटील, किरण भालेराव, पवार, लालचंद त्र्यंबक पाटील, सुरेश विक्रम पाटील, भाईदास सोनू भिल, जितेंद्र प्रेमसिंग राजपूत आदींचा समावेश आहे. बाजार समितीच्या विद्यमान संचालकांची मुदत सप्टेंबर 2020 ला संपली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या. त्यापूर्वी सहाय्यक उपनिबंधकांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे. सद्या प्रशासक राज असून राज्य शासनाने या मंडळावर नऊ जणांच्य नियुक्तीला परवानगी दिल्याचे पत्र पणन विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोयर यांनी दिले आहे.