तुला कोर्टात बघून घेईन असे एखाद्या व्यक्तीने दुस-या व्यक्तीला म्हणणे धमकी होत नाही तसेच तो कायद्याने अपराध होत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.
पांढरकवडे जिल्हा यवतमाळ येथील रजनीकांत बोरेले यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. रोहित देव यांच्याकडून हा निर्वाळा देण्यात आला आहे. 7 मार्च 2009 रोजी रजनीकांत बोरेले यांचा तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी यांच्यासोबत वाद निर्माण झाला होता. त्यावेळी बोरेले यांनी भराडी यांना “मी तुम्हाला कोर्टात बघून घेईन असे म्हटले होते. मी तुमच्या चुकीच्या गोष्टी कोर्टापुढे मांडणार असे बजावले होते. आपणास रजनीकांत बोरेले यांनी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा रद्द करण्यासाठी बोरेले यांनी न्यायालयात मागणी केली होती. सत्र न्यायालयाने बोरेले यांची मागणी फेटाळल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. सत्र न्यायालयातील बोरेले यांच्यावरील खटला रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.