जळगाव : रामेश्वर कॉलनीमधील प्रभाग क्रमांक 14 मधे विविध समस्यांनी घर केले आहे. या प्रभागातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनवणे यांनी याबाबतचे निवेदन म.न.पा. स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांना दिले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी प्रभाग 14 मधील समस्या कथन केल्या असून त्या सोडवण्याची विनंती केली आहे.
प्रभाग 14 मधील मेहरुण तलाव बांध परिसर सप्तशृंगी मंदीर ते रामेश्वर कॉलनी परिसरातील मार्गावर दिवाबत्तीची सोय नाही. या रस्त्याने कामगार वर्ग ये – जा करत असतो. रात्रीच्या वेळी या रस्त्याने अंधार असल्याने कामगार वर्गाला चाचपडत रस्त्याने जावे लागते. या भागातील रस्ते अमृत योजनेमुळे खोदले आहेत. या खोदकामामुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे गढूळ पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह प्रभागातील विविध समस्यांची मनपा स्थायी समिती सभापतींनी प्रत्यक्ष येवून पाहणी करुन खात्री करुन घ्यावी अशी देखील मागणी अनिल सोनवणे व अनुताई कोळी यांनी समस्त प्रभागवासीयांच्या वतीने केली आहे.