मुंबई : नव्वदच्या दशकात ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ म्हणून प्रसिद्धी मिळवलेले स.पो.नि. सचिन वाझे तब्ब्ल सोळा वर्षांनी पोलिस दलात परत आले आहेत. पोलिस दलात परत आल्यानंतर त्यांना क्राईम ब्रॅंचच्या गुप्तचर विभागपदी नियुक्ती देण्यात आली. अगोदर सहायक पोलिस निरिक्षक त्यानंतर पोलिस निरिक्षक व नंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक असा पोलिस दलात बढतीचा क्रम असतो. मात्र सचिन वाझे यांची सशस्त्र पोलिस दलातून त्यांनी थेट गुप्तचर विभागाचे प्रमुखपदी येत ओव्हरटेक कसा काय केला? असा प्रश्न आणी आरोप भाजपकडून केला जात आहे.
स.पो.नि.सचिन वाझे यांच्या बचावासाठी एवढा फोर्स का लावला जात आहे? सचिन वाझे हे सभागृहापेक्षा मोठे आहेत काय? असा प्रश्न विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यांना अजुन अटक का करण्यात आली नाही असा देखील प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने लिहिलेला जवाब त्यांनी 9 मार्च रोजी सभागृहात वाचला. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा आरोप सचिन वाझे यांच्यावर लावण्यात आला आहे.
याउलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे काय? अगोदर फाशी व नंतर चौकशी अशी तपासाची पद्धत नव्हे. अगोदर तपास तर होऊ द्या. वाझे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
“महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22 (न) चे पोट कलम (2) आणि त्याखाली असलेल्या सुधारित स्पष्टीकरणाप्रमाणे आयुक्त स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना अपवादात्मक प्रकरणात जनहितार्थ आणि प्रशासनिक निकडीप्रमाणे सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, पोलीस अस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जनहितार्थ विशेष बाब म्हणून प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत असल्याचा उल्लेख स.पो.नि. सचिन वाझे यांच्या बदलीच्या ऑर्डरमध्ये करण्यात आला आहे.
सन 1990 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या स.पो.नि.सचिन वाझे यांनी साठपेक्षा अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख होते त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली सचिन वाझे यांनी सेवा बजावली आहे. स.पो.नि. सचिन वाझे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई व राजाराम निकम यांना देखील नव्याने सेवेत हजर करुन घेण्यात आले.
मुंबईच्या घाटकोपर बस स्थानकावरील बॉम्बस्फोट घटनेतील आरोपी ख्वाजा युनूस याचा पोलिस कोठडी दरम्यान मृत्यू झाला होता. या मृत्युप्रकरणी काही पोलिसांवर हत्येसह पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या नावांच्या यादीमधे स.पो.नि. सचिन वाझे यांचे देखील नाव होते. याप्रकरणी सचिन वाझे सन 2004 मधे निलंबित झाले होते. सन 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता मात्र याप्रकरणी तपास सुरु असल्यामुळे त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला होता. सन 2008 मधे दसरा मेळाव्यादरम्यान ते शिवसेनेत दाखल झाले होते.