नवी दिल्ली : महारष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत स.पो.नि. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणी ठाकरे सरकारवर हल्ला केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर वाहनात सापडलेले स्फोटक प्रकरण सध्या गाजत आहे. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली.
सचिन वाझे सन 2004 मधे निलंबीत झाल्यानंतर त्यांना पुन्हा नोकरीवर का घेण्यात आले. सन 2007 मधे त्यांनी व्हायलेंटरी रिटायरमेंटचा अर्ज केला होता. त्यांची चौकशी सुरु असल्यामुळे त्यांना व्हीआरएस देण्यात आला नाही. सन 2018 मधे मुख्यमंत्री असतांना आपल्यावर शिवसेनेकडून दडपण असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स.पो.नि.सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आपल्याला उद्धव ठाकरे यांचा निरोप आला होता असे फडणवीस म्हणाले. वाझे यांची पार्श्वभूमी बघून अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेतल्यानंतर आपण त्यांना सेवेत न घेण्याचा निर्णय घेतला होता.
सन 2017 मध्ये सचिन वाझे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून उघडकीस आलेल्या रॅकेटमधे स.पो.नि. सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. क्राईम इंटेलिजन्स युनिट (सीआययु) दोन पोलिस निरिक्षक दर्जाचे अधिकारी चालवतात. मात्र दोन्ही पीआय दर्जाच्या अधिका-यांच्या बदल्या करुन स.पो.नि. सचिन वाझे यांना सीआयुचे प्रमुखपद देण्यात आले.