मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून विज ग्राहकांच्या तक्रारी देखील वाढत आहेत. कोरोना कालावधीत मिटर रिडींग न घेता बिले पाठवली जात असल्याच्या तक्रारी विज ग्राहकांनी केल्या आहेत. कोरोनामुळे मिटर रिडींग घेणे महावितरणला शक्य होत नसल्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. विज ग्राहकांनी स्वत:च मिटर रिडींगचा फोटो काढून तो अॅपच्या माध्यमातून पाठवण्याचे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे. विज बिल व थकबाकी बाबत पार पडलेल्या बैठकीत राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी ग्राहकांना अॅपच्या माध्यमातून रिडींग पाठवण्याचे व विज बिल भरण्याचे आवाहन केले आहे.
थकबाकी वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना दुर्दैवी असून त्या खपवल्या जाणार नसल्याचा इशारा देखील उर्जा मंत्री राऊत यांनी दिला. ऑनलाईनसह मोबाईल अॅपच्या माध्यमातून तक्रारीची सोय करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना ऑनलाईन अथवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून तक्रार करता येत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन तक्रारीची सोय करुन द्यावी असे निर्देश राऊत यांनी दिले आहेत.