नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचा प्रमुख आरोप केला आहे. या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दोन याचिक दाखल झाल्या होत्या. या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरुच राहणार आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने एक व राज्य सरकारच्या वतीने दुसरी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप गुन्हा दाखल करण्यायोग्य आहेत काय? याप्रकरणी तपास करण्याची 15 दिवसांची मुदत मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांनी तर अनिल देशमुख यांच्या वतीने अॅड. कपिल सिब्बल यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. जयश्री पाटील यांच्या वतीने अॅड. हरीश साळवे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.