जळगाव : सध्या कोरोना विषाणूसोबत मुकाबला करतांना सामान्य जनतेपासून प्रशासकीय यंत्रणेची दमछाक होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. लॉकडाऊन कालावधीत हातातुन गेलेल्या रोजगारामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. कुणाची जमापुंजी संपली आहे. रस्त्यावर कुणी विनाकारण फिरतांना आढळला तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
परवा जळगाव शहरातील कॉंग्रेस नेते गफ्फार मलीक यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दीचा महापुर लोटला. या गर्दीच्या महापुरामुळे कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले असून कोरोनाला जणूकाही आमंत्रण मिळाले आहे. गेल्या दिड महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे जेमतेम आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा उद्भवणार नाही याची कुणी शाश्वती देईल काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता तसेच सुरेश पाटील (अण्णा हजारे कृत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा संघटक तथा भारतीय जनसंसद जिल्हा जळगाव) यांनी अनुक्रमे राज्याचे मुख्यमंत्री व जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेकडे तक्रार केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत साथ रोगाच्या कारवाईतील दुजाभावाबद्दल लक्ष वेधले आहे. भल्या पहाटे फिरणा-या सामान्य जनतेवर आणि विवाहात नियमांचे उल्लंघन झाले म्हणून दंडात्मक कारवाई करणारे प्रशासन कॉंग्रेस नेते गफ्फार मलीक यांच्या अंत्ययात्रेत उसळलेल्या गर्दीवर कारवाई करण्यात भेदभाव का करत आहे? असा प्रश्न विचारला आहे. हाजी गफ्फार मलीक यांच्या निधनाबद्दल सर्व सामान्यांसह सर्वांना दुख: झाले असले तरी कोरोनाचे निर्बंध लक्षात घेत नियम सर्वांना समान असायला हवेत. त्यामुळे याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होणार काय असा प्रश्न दिपककुमार गुप्ता यांनी प्रशासनाला केला आहे. यावलचे रहिवासी असलेले सुरेश पाटील (जिल्हा संघटक – अण्णा हजारे कृत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव) यांनी देखील जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक जळगाव यांना याप्रकरणी गुन्हे दाखल करुन कारवाई करणार काय असा प्रश्न केला आहे.