जालना : कायदेशीर आदेश नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद स्थित जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी झडती घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी दोघा पोलीस उपनिरीक्षकांसह तिन पोलिस कर्मचारी अशा पाच जणांना निलंबीत करण्यात आले होते. मात्र आता त्या पाचही पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवेदनानंतर गृहमंत्र्याकडून ते निलंबन मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माजी मंत्री तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली होती. माजी आमदार चंद्रकांत दानवे हेदेखील त्यावेळी त्यांच्यासमवेत होते. गृहमंत्र्यांनी अर्जुन खोतकर यांचे म्हणणे ऐकून व समजून घेतले. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कोणतीही चूक नसल्याचे गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. नव्हती. पोलिसांवर अशा पद्धतीने चुकीची कारवाई होत असल्यास पोलिसांनी काम तरी कसे करावे? असा सवाल खोतकर यांनी वळसे पाटील यांना केला होता. अखेर चर्चेअंती वळसे पाटील यांनी हे निलंबन मागे घेतले जाईल असा शब्द दिला होता. आज संबंधित पाचही पोलीसांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले.