पुणे : ठराविक लोकांवर वेळ साधून ईडीच्या कारवाया होत असल्याचे अभिनेत्री तथा शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. पुणे येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधतांना उर्मीला मातोंडकर बोलत होत्या. त्यांच्या हस्ते आज शिवसेना शिवसंपर्क मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रीमंडळातील पुनरागमनाच्या केवळ प्रसार माध्यमात चर्चा असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत बोलतांना त्यांनी विषयाला बगल दिली. शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येक घरात जाणार असून पुढील निवडणूका स्वबळावर लढायच्या की एकत्रीतपणे याबाबतचा निर्णय नेतृत्व घेणार असल्याचे देखील मातोंडकर यांनी म्हटले.
शिवसेना नेहमीच मदतीसाठी सरसावली आहे. कोरोना कालावधीत शिवसेनेने लोकांना सर्वतोपरी मदत केली आहे. शिवसेना सत्तेत आल्यामुळे एक सुवर्ण पान उलगडले गेले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वासाठी हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. पडत्या आणि वाईट काळात संघटनकौशल्य कसे आहे हे समजते असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.