औरंगाबाद : कित्येक दिवसांपासून प्रलंबीत असलेली पोलिस भरतीची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज केली आहे. गृहमंत्री वळसे पाटील आज औरंगाबाद येथे आले आहेत. पत्रकारांसमवेत वार्तालाप करतांना त्यांनी पोलिस भरतीची घोषणा केली आहे.
राज्यात एकुण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी सुरुवातीला 5200 पदांची भरती या वर्षाच्या अखेरीस केली जाणार आहे. त्यानंतर राहिलेल्या 7 हजार पदांची भरती देखील पुर्ण केली जाणार आहे. ज्या पोलिस कर्मचा-यांचा कोरोना काळात कोविडमुळे मृत्यू झाला त्या कर्मचा-यांच्या मुलांना नोकरी देण्याचे धोरणदेखील मंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच नुकसानभरपाईची 50 लाख रुपयांची रक्कम वितरीत झाली आहे. राहिलेली रक्कम देखील लवकरच वितरीत केली जाणार आहे. पोलिस कर्मचारी वर्गास कर्ज मिळत नसल्याने त्याबाबत देखील लवकरच विचार केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.