नवी दिल्ली : मोदी सरकारने मध्यंतरी सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांसह मालमत्तांची विक्री करुन निधी जमा करण्यास सुरुवात केली होती. आता भारतीय रेल्वेकडून देखील निधी उभारण्यासाठी हावडा रेल्वे स्टेशन नजीकच्या प्राइम लँडला 99 वर्षांच्या लीजवर देण्याची योजना आखण्यात आली आहे.
लीजवर घेतल्यानंतर या प्राइम लँडचा निवासी आणि व्यावसायिक असा दुहेरी वापर करता येणार आहे. हुगळी नदीनजीक असलेल्या 88 हजार 300 चौ.मी. जमीनीचे मुल्य 448 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाकडून या जमिनी लीजवर देण्यासाठी बोलींचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सदर जमीन हावडा रेल्वेस्टेशनपासून दिड कि.मी. अंतरावर आहे. ही जमीन 20 मीटर रुंद असलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने असून इच्छुक विकासक 29 ऑगस्ट 2021 पर्यंत आपली बोली लावू शकतात. या जमिनीचा व्यावसायिक व निवासी असा दुहेरी वापर करता येऊ शकतो. तसेच तेथे वॉटर स्पोर्टसची सुविधा देखील तयार होऊ शकते. बोली जिंकणाऱ्या कंपनीला या जागेवर दहा वर्षाच्या आतील कालावधीत विकासकामे पुर्ण करावी लागणार आहेत. सद्यस्थितीत रेल्वेच्या ताब्यात देशभरात एकुण 43 हेक्टर जागा विना वापराची पडून आहे.