मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंध देखील शिथिल केले जाण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील निर्बंध 1 ऑगस्टपासून शिथिल करण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना याबाबत माहिती दिली आहे. दोन दिवसांत लोकलसंबंधी निर्णय देखील होऊ शकतो असेही टोपे यांनी म्हटले आहे.
राज्यातील अकरा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण अद्यापही जास्त आहेत. त्यामुळे तेथील निर्बंध शिथील केले जाणार नाही. इतर जिल्ह्यांच्या बाबतीत तिस-या टप्प्याचे निर्बंध शिथिल करण्यासंबंधी आरोग्य विभागाच्या आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या सूचना मिळून मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली जाणार आहे. मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
इतर 25 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट अत्यल्प आहे तेथील निर्बंध शिथिल करतांना दुकानांना दुपारी चारपर्यंत देण्यात आलेली वेळ वाढवली जाण्याची शक्यता आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानही देण्याबाबतचा निर्णय देखील दोन दिवसांत मुख्यमंत्री घेणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात तिसरी लाट येईल, तेव्हा येईल, मात्र राज्याची तयारी आहे का? हे महत्वाचे आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी वर्गाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांना लागणाऱ्या औषधांची देखील तयारी करण्यात आली आहे. लसीकरणाला योग्य तो प्रतीसाद देण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.