नाशिक : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकिल गुलाब मणियार (सातपूर कॉलनी भाजी मार्केट परिसर ) असे या शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीताचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी सदर शिक्षा सुनावली आहे.
सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत 6 जुन 2018 रोजी श्रीकृष्णनगर, शीतल अपार्टमेंटच्या गच्चीवर आरोपी अकिल गुलाब मणियार याने आठ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले होते. या घटनेबाबात कुणाला सांगितल्यास जिवे ठार करण्याची धमकी आरोपीने दिली होती.
या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोक्सो नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. सी. अवतारे यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावे संकलीत करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
फिर्यादी, साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांनी न्यायालयात सादर केलेल्या सर्व परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घेत आरोपी अकिल गुलाब मणीयार यास दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. अॅड. दीपशिखा भिडे यांनी सरकारच्या वतीने न्यायालयीन कामकाज पाहिले. पैरवी पी. व्ही. पाटील, एस. सी. शिंदे यांची याकामी मदत झाली.