मुंबई : महाराष्ट्रात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा नियोजित केलीहोती. मात्र उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर सदर प्रवेश परीक्षा रद्द केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीच्या परिक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार होती. या परीक्षेसाठी मंडळाच्या वतीने पोर्टलची निर्मिती केली होती.
सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत दिली होती. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीने सीईटी परीक्षेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 ऑगस्ट रोजी संपली. सीबीएसई दहावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या.
मुंबई उच्च न्यायालयात अकरावी प्रवेशाबाबत सीईटी प्रवेश परीक्षेबाबत याचिकेवरील सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने अॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारने अकरावी प्रवेशाच्या बाबतीत 28 मे रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीने सदर याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली होती.
सदर याचिकेवर शुक्रवारी न्या. आर.डी. धानुका आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली होती.