अकोला : चौथ्या इयत्तेत शिकणा-या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक छळ प्रकरणी अकोला येथील पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्या. व्हि.डी. पिंपळकर यांनी आरोपीस दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी देण्यात आलेल्या या निकालामागे गुड टच व बॅड टच बाबतचे शिक्षण देणा-या शिक्षीकेचा देखील तेवढाचा महत्वाचा वाटा असल्याचे देखील म्हटले जात आहे.
पिडीत विद्यार्थिनी शिक्षण घेत असलेल्या शाळेतील शिक्षिकेने मुलींना स्पर्शज्ञानाची माहिती दिली होती. गुड टच व बॅड टच यातील फरक कसा ओळखावा याचे ज्ञान मिळाल्यानंतर पिडीतेने तिच्यावर दोन वर्षापासून होत असलेल्या अत्याचाराची व्यथा तिच्या आईजवळ कथन केली. त्यानंतर या बलात्काराच्या गुन्ह्याला वाचा फुटली व उघडकीस देखील आला.
स्वप्नील विनोद डोंगरे (रा. अजनी खु. ता. बार्शीटाकळी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी आरोपी 21 वर्षाचा तर पिडीत मुलगी चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होती. चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असतांना शिक्षीकेने वर्गात सांगितले होते की नको त्या जागी कुणी स्पर्श करत असेल तर त्याबाबतची माहिती आपल्या आईला सांगा. शिक्षीकेचे बोलणे ऐकून भेदरलेल्या मुलीने आपल्यावर गुदरलेला प्रसंग तिच्या आईला कथन केला. गेल्या वर्षभरापासून पिडीत विद्यार्थिनीसोबत होत असलेल्या अन्यायाला या निमीत्ताने वाचा फुटली व प्रकरण पोलिस स्टेशन व न्यायालयापर्यंत गेले.
11 जुलै 2019 रोजी पोलिस स्टेशनपर्यंत प्रकरण गेल्याचे समजताच आरोपीने पलायन केले होते. आरोपी स्वप्नील विनोद डोंगरे याच्याविरोधात भा.द.वि. 376 (अ), (ब), 376 (एन), पोक्सो 3, 4,5, 6,11,12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी न्यायालयात चार्जशिट दाखल केले. सरकारच्या वतीने या प्रकरणी आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी व पीडितेची साक्ष मोलाची ठरली.
दोन्ही बाजूचा युक्तीवाद श्रवण केल्यानंतर न्यायालयाने आरोपीस कलम 376 मधे जन्मठेप, एक लाख रुपये द्रव्यदंड, पोक्सो 3 व 4 मधे जन्मठेप, एक लाख रुपये द्रव्यदंड, पोक्सो 5,6 मधे जन्मठेप व एक लाख रुपये द्रव्यदंड, पोक्सो 11. 12 मधे तीन वर्ष शिक्षा व 50 हजार रुपये द्रव्यदंड सुनावण्यात आला. सरकारी वकील अॅड. मंगला पांडे यांनी याप्रकरणी न्यायालयीन कामकाज पाहिले.