बुलडाणा – बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कव्हळा येथे पन्नास वर्षाच्या नराधमाने आठ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी निकाल देण्यात आला आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 1 चे न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपीस विस वर्ष जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कव्हळा येथील एक महिला 7 मार्च रोजी इतर महिलांसमवेत शेतात कामाला गेली होती. तिच्यासोबत तिने तिच्या आठ वर्षाच्या बालिकेला देखील नेले होते. त्या शेतात महिलेच्या घराजवळ राहणारा गजानन ज्ञानबा मोरे (50) हा मजुरीसाठी कामाला आलेला होता. गजाननची नात व पीडित बालिका अशा दोघीजणी गोठ्याजवळ खेळत होत्या. गजानन मोरे याने पीडित बालिकेस पाईप उचलण्याच्या बहाण्याने नेले. त्याठिकाणी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने बालिकेवर अत्याचार केला.
या घटनेबाबत कुणाला सांगायचे नाही मी घरी गेल्यावर तुला विस रुपये देईन असे आमिष त्याने तिला दिले. त्याच दिवशी सायंकाळी पिडीत बालिकेने हा प्रकार घरी गेल्यावर तिच्या पालकांना कथन केला. या प्रकरणी बालिकेच्या आईने 9 मार्च रोजी अमडापूर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी गजानन मोरे याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेनंतर झालेल्या तपासाअंती त्याच्याविरुद्ध बुलढाणा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
बुलढाणा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 1 मध्ये या खटल्याचे कामकाज सुरु होते. एकुण 9 साक्षीदार याप्रकरणी तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. आशिष केसाळे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत न्या. आर. एन. मेहेरे यांनी आरोपी गजानन मोरे याला दोषी ठरवले. भा.दं.वि.376, ए.,बी. व पोस्को कायद्याचे कलम 4, 6, 8 नुसार त्याला विस वर्ष कठोर कारावास सुनावण्यात आला. याशिवाय दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा देखील सुनावण्यात आली. तत्कालीन तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक सोनवणे व पैरवी म्हणून हे.कॉ. संजय ताठे यांनी तपासकामी मदत केली.