अमरावती – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीचा खून करणा-या आरोपीस अमरावती जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 4) एस. ए. सिन्हा यांनी आजीवन कारावासासह पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त सश्रम कारावासाची सजा देखील सुनावली आहे. दंडाची रक्कम मयत तरुणीच्या परिवारास देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. तुषार किरण म्हस्करे (24) रा. मलकापूर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मोठ्या प्रमाणात गाजलेली सदर हत्येची घटना 9 जुलै 2019 रोजी राजापेठ पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयासमोर घडली होती. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या चार्जशिटनुसार आरोपी तुषार व मयत अल्पवयीन तरुणीचा परिचय होता. मयत तरुणीने तुषारसोबत ओळख ठेवण्यास कालांतराने नकार दिला होता.
तरुणीच्या वडीलांची तुषारने भेट घेत मला तिच्याशी लग्न करायचे आहे, असे म्हटले होते. तुषारच्या त्रासाला वैतागून सदर मयत तरुणीने बडनेरा पोलिस स्टेशनला त्याच्याविरोधात तक्रार नोंद केली होती. 9 जुलै 2019 रोजी घटनेच्या दिवशी दुपारी मयत तरुणी तिच्या मैत्रिणींसह अंबादेवी ते राजापेठ मार्गावर असलेल्या शाह कोचिंग क्लासेस मध्ये पायी पायी जात होती. तुषारने तिचा पाठलाग करत तिच्यावर एकाएकी चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सदर तरुणी मृत्युमुखी पडली तर तिची मैत्रीण जखमी झाली होती. त्यानंतर घटनास्थळावरुन पलायन केलेल्या आरोपी तुषारला परिसरातील लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
मयत तरुणीच्या मैत्रीणीने राजापेठ पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तुषार विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. न्यायालयात रितसर आरोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायमुर्ती एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयात एकुण बारा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तक्रारदार तरुणी, डॉक्टर, प्रत्यक्षदर्शी व पंचांची साक्ष मोलाची ठरली. साक्षीदारांच्या साक्षीसह सरकार पक्षाचा युक्तीवाद लक्षात घेत न्या. सिन्हा यांनी आरोपी तुषार यास आजीवन कारावासासह पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त सश्रम कारावासाची सजा देखील सुनावली आहे. दंडाची रक्कम मयत तरुणीच्या परिवारास देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता अॅड. परीक्षित गणोरकर यांनी युक्तीवाद केला.