नाशिक – नाशिकच्या सातपूर कॉलनी भागात सन 2016 मध्ये झालेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने महिलेसह तिघांना दोषी ठरवत पाच वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे.
अर्चना किशोर जाधव (28), संजय वसंत जाधव (34) व महेश खिराडकर (27) अशा तिघांनी सुशांत गजानन बच्छाव (20) रा. राजाचे कौळाणे, ता. मालेगाव या तरुणास बलात्कार केल्याच्या संशयावरुन लाथा-बुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीत जबर दुखापत झाल्याने सुशांत बच्छाव या तरुणाचा मृत्यू झाला होता.
सातपूर पोलीस स्टेशनला या प्रकरणी भा.द.वि. 302, 323, 504,506,34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक जे. जी. गायकवाड यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास केला होता. त्यांनी या तपासात आरोपींविरोधात सबळ पुरावे संकलीत केले.
सदर खटल्याची सुनावणी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांच्या न्यायालयात झाली. आरोपींविरोधात फिर्यादी, साक्षीदार, पंच यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार आरोपींना सीआरपीसी कलम 235 (2) नुसार पाच वर्षासाठी सश्रम कारावास व प्रत्येकी हजार रुपये दंड द्रव्याची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. एस. जी. कडवे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. हवालदार डी. एस. काकड, पी. व्ही. पाटील, एस. यू. गोसावी यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज केले.