गोंदीया (अनमोल पटले) : मुंबई हावडा तसेच हावडा मुंबई दुरंतो रेल्वेला गोंदिया येथे थांबा देण्याबाबत आ. विनोद अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेत विनंती केली आहे.
गोंदिया रेल्वे स्टेशन हे देशातील हावड़ा – मुंबई तसेच दिल्ली – चेन्नई मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. देशाच्या चारही दिशेला येथून शंभरहुन अधिक रेल्वे गाड्या धावतात. दररोज हजारो प्रवाशी येथून ये जा करतात. असे असले तरी मुंबईला जाण्यासाठी गोंदीया येथून सुपर फास्ट ट्रेन उपलब्ध नाही. बालाघाट जिल्ह्यातील अनेक प्रवासी मुंबईला जाण्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानाकालाच प्राधान्य देत असतात. जवळपास सतरा तास प्रवास केल्यानंतर मुंबईला पोचता येते. मुंबईला जाण्यासाठी गोंदीया येथून सायंकाळी कुठलीही गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतो.
गाडी क्रमांक 12261 हावडा – मुंबई आणि 12262 मुंबई – हावडा दुरंतोला गोंदिया येथे थांबा दिल्यास सोळा तासांचा प्रवास तेरा तासांवर येईल आणि नागरिकांचा वेळ वाचेल. रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आ. विनोद अग्रवाल यांना दिले आहे.