दरवर्षी पावसाळ्यानंतर दसरा येतो. शेतक-यांचे धान्य घरात येण्याच्या या क्षणाला त्यांच्या कुटूंबात आनंद येतो. शेतमजुरांच्या घरातही धान्याची छोटी रास जमते. त्यात भर म्हणजे “रामायण” माहित असलेल्यानुसार “लंकापती” “दुर्जन”- राक्षस असलेल्या “रावणा”ला ठार मारणा-या प्रभु श्रीराम यांच्या विजयपर्वाचा आनंद साजरा करण्यचा हा क्षण म्हटला जातो. हा क्षण आम्हा समस्त भारतीयांच्या मनामनात नव्हे तर ह्रदयसिंहासनावर “प्रभु श्रीराम” आराध्य वंदनीय दैवत म्हणून विराजमान आहे. शिवाय दुष्ट शक्तीवर प्रभु श्रीरामांनी सुष्ट शक्तीचा विजय होत असल्याचा त्रिकालाबाधीत संदेश दिल्याचा हा क्षण. त्यामुळेच प्रभु श्रीरामांच्या चरणी भक्तीभावाने मानवंदना देण्याचा हा मौलिक क्षण अनुभवतांनाच सज्जन प्रवृत्तीचे प्रतिक म्हणजे प्रभू श्रीराम आणी दुर्जन प्रवृत्ती प्रतिक म्हणजे “रावण” असेच आजवर म्हटले गेले. वंदनीय प्रभू श्रीराम यांची पितृभक्ती – मातृभक्ती –जीवन आदर्श हे भारतमान्यच नव्हे जगमान्य होत.
तथापी “रावण” म्हणजे “राक्षस – दुराचारी” असल्याच्या भुमिकेला मात्र सुमारे तिस ते पस्तीस वर्षापासून काहीसा छेद दिला जात आहे. साधारणत: सन 1860 ते 1960 या शंभर वर्षाच्या कालखंडात आणि त्यापुर्वीच्या शंभर दोनशे वर्षापुर्वी “रावण” म्हणजे राक्षस – दुर्जन – दुराचारी प्रवृत्ती असेच काहीसे अनेक पिढ्यांना सांगण्यात आले. लंकापती रावणाने “सितामातेचे” ज्या पद्धतीने (अप) हरण केले ती त्याची कृती भारतीय जनमानसात एक प्रकारचा आघात आणि त्याला “दुराचारी” ठरवणारी ठरली.
परंतु “दुरदर्शन” वर रामानंद सागर कृत प्रसारित झालेल्या “रामायण” या मालिकेतून “रावण” हा थोर शिवभक्त – अघोर तपस्वी ब्रम्हाला स्वत:चे शिर अर्पण करणारा – ज्ञान संपन्न असल्याचे दर्शवण्यात आले. दुर्जन ही प्रतिमा बव्हंशी पुसली गेली. रावणासारख्या दुसरा शिवभक्त नाही असे देखील म्हटले गेले. जुन्या पिढ्यांचे रावणाबाबतचे आकलन थोडे बाजुला ठेवले तर आजच्या काळात कोणतेही विधान तत्वज्ञान अनेक निकष लावून मल्टी लेव्हलने तपासून बघण्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीरेखेचे गुण – अवगुणांचे मुल्यमापन होतांना दिसते.
आता आपण आहोत सन 2021 मधे. आपला देश भारत व राज्य महाराष्ट्र. प्रत्येक प्रांताचे सण, चालीरिती भिन्न आहेत. दक्षिण भारताच्या टोकाकडे रावणाला तितका वाईट दुर्जन समजत नाहीत असे म्हणतात. परंतु रावणाचे दुर्जन स्वरुपी वर्तन सर्वत्र निंदनीय – त्याज्य समजले जाते. राज्यात प्रत्येक राजकीय पक्ष – समुह संघटना स्वत:ला रामाच्या भुमिकेत पाहते. इतकेच नव्हे तर आपला स्पर्धक – विरोधक याला रावणाच्या फ्रेममधे बसवून वाईट ठरवण्याचा प्रयत्न होतांना दिसतो. तेव्हा सत्य तपासायला जाता कोण श्रीराम आणि कुणाला रावण समजावे असा प्रश्न जनसामान्य मनांचा गोंधळ उडतो. सत्तेत असलेल्यांचा प्रांतात या क्षणी मोठा उन्माद दिसून येतो. विजयादशमी उर्फ सिमोल्लंघन हे पर्वणीचे आनंद क्षण म्हणून विजयोन्माद उल्हासी आनंदाचे म्हटले जातात.
महाराष्ट्रात कुणाचा कितीही विजयोन्माद शिखरावर असला तरी प्रत्यक्षात काही “रावण प्रवृत्ती” आजही आजुबाजुला वावरत असल्याचा साक्षात्कार रा.कॉ.तून भाजपावासी झालेल्या सौ. चित्राताई वाघ यांनी बोलून दाखवला आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रा. कॉ. महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांची नियुक्ती होत असल्याचे बोलले जाताच चित्राताईंना कंठ फुटला. या महत्वाच्या पदावर “रावणाला मदत करणा-या शुर्पनखेला बसवू नका” असे त्यांनी बजावताच वादाला तोंड फुटले. या दोन महिला नेत्यांच्या वादात सौ. विद्याताई चव्हाण या तिस-या महिला नेत्याची एंट्री झाली. एकमेकांवर आरोप फैरी झडल्या. आव्हाने – प्रती आव्हाने दिली गेली. लगेच चित्राताईंनी “आपण रुपालीताईंचे नाव घेऊन त्यांना शुर्पनखा म्हणालो नाही असे स्पष्ट केले. “खंडणी घेतल्याचा आरोप करणा-याला समोर आणा त्याचे थोबाड फोडू” असे आव्हान देखील त्यांनी दिले.
राज्याचे महिला आयोग अध्यक्षपद रिक्त आहे. राज्यात भाजपा सत्तेवर असतांना तेथे विजया रहाटकर या होत्या. आताही भाजपाची सत्ता असती तर कदाचीत सौ चित्राताई वाघ यांची महिला आयोग अध्यक्षपदी हमखास नियुक्ती झाली असती. परंतु सत्ता महाविकास आघाडीची असतांना तेथे सौ. रुपालीताई चाकणकरांची नेमणूक होत असेल तर कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय? काही कारणास्तव भाजपावासी झालेल्या सौ. चित्राताई वाघ योग्य वेळ साधून रा.कॉ.त परत आल्या असत्या तर कदाचीत त्यांचे महिला क्षेत्रातील सेवा जेष्ठत्व बघून त्यांचा विचार अग्रक्रमाने झाला असता असे बोलले जाते. सौ चित्राताई वाघ यांच्या आक्रमक शैलीच्या चांगल्या धडाकेबाज कार्याबद्दल कुणाचे दुमत दिसत नाही. या भांडणातच आजुबाजूला बरेच रवण फिरताहेत ते कुणाला दिसत नाही काय? असाही उल्लेख झाला. येथे रावण ही दुष्ट प्रवृत्ती हा अर्थ ध्वनीत होते.
भाजपात गेलेल्या चित्राताईंना भाजपाखेरीज अन्य राजकीय पक्षात तर गैर भाजपाईंना प्रतिस्पर्धी पक्षात “रावण दुर्जन पार्टी” दिसत असतील तर सर्वच राजकीय पक्षांमधील रावण प्रवृत्ती जनतेसमोर आणण्याचे काम या महिला नेत्या का करत नाही? असा प्रश्न पडतो. राज्यभरात रेल्वेगाड्या – बसेस, रेल्वे स्थानके, रस्ते अशा अनेक ठिकाणी महिलांवर होणारे वाढते बलात्कार, हिंसाचार, खून प्रकरणाचा धडाका लागला असतांना त्यावर महिला संघटना नेत्यांच्या मुखाला कुलूप ठोकले गेले काय? असे जनता विचारतांना दिसते.
सन 1990 च्या दशकात सध्या रा. कॉ. ध्यक्ष असलेले माजी संरक्षण मुख्यमंत्री मा. शरदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात नगरपालिका – जिल्हा सहकारी बॅंक क्षेत्रात नवी राजकीय फळी उदयाला आली होती. तेव्हा म्हणजे सन 1985 ते 1990 च्या कालाखंडात मुरलीधर अण्णा पवार यांच्या सारथ्याने हे नवे नेतृत्व भ्रष्टाचारी रावण प्रवृत्तीचा नाश करतील म्हणून धनुष्यबाण सोडण्याचा अभिनय करत “रावणदहण” झाले होते. अशा प्रकारे रावणदहण करणारे आज भ्रष्टाचाराच्या आरोपान्वये दोषी ठरुन शिक्षाप्राप्त आहेत. बोलो जय श्रीराम की!