कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कधीकाळची भक्कम नेता अशी उभारलेली प्रतिमा हिच भारताची अडचण ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरद्वारे चीनच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देण्याचे सुचीत करुन राहुल गांधी पुढे म्हणतात की निवडणूकीपुर्वी 56 इंच छातीचा नेता , “लार्जर दॅन साईज” अशी अशी मोदीजींची भक्कम प्रतिमा जाणीवपुर्वक निर्माण करण्यात आली.
तथापी चीन त्यांच्या अजेंड्याप्रमाणे पाकीस्तानशी केव्हाही दोस्ती करुन हानी पोचवू शकतो. लडाख भागातील अलिकडचे त्यांचे सैनिकी प्रदर्शन, हल्ला पाहता चीन त्यांच्या हिशोबाने जगाचा नवा नकाशा करु पाहतो. त्यासाठी रस्ते बांधणीचा त्यांचा कार्यक्रम चिंताजनक आहे. भारतासाठी हा एक सापळा आहे. भारतातल्या विरोधी पक्षाच्या एका नेत्याला देशाच्या भवितव्याची काळजी वर वर का होईना पण वाटते हे जागृत विरोधी पक्षाचे बरे उदाहरण वाटते.
तथापी राहुल गांधी यांना आताच मोदीजींच्या भक्कम प्रतिमेची अडचण का वाटावी? भारत प्रेमाचा कळवळा का यावा? कोरोना काळातील लॉकडाऊन देशाच्या उद्योग जगताला फटका देवून गेला. अनेक राज्यात कोरोनाची भिती आहे. खासगी हॉस्पीटल्स मधील कोरोना उपचार लाखोच्या घरात जातो. हॉस्पीटल्सच्या मेडीकल उपचार पद्धतीत कशी लुटमार चालते? यावर अक्षय कुमारची भुमिका असलेल्या “गब्बर इज बॅक” चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
याच कोरोना काळात भाजपाने काठावर पास झालेल्या कॉंग्रेस पक्षाची मध्य प्रदेशात सत्ता काढून घेतली. आता राजस्थानात तसाच प्रकार दिसतो. पुढचा नंबर महाराष्ट्राचा अशी हवा पसरवली गेली. एप्रील अखेरीनंतर अनेक राज्यातील मजुरांच्या घरवापसीचा मुद्दा गाजला. रोजगार कामधंदा बुडाल्याचा कहाण्या बाहेर आल्या. मजुरांच्या पायाला आलेले फोड टी.व्ही. चॅनेल्सच्या स्टोरीचा विषय बनले.
हे सारे होत असतांना देशातील विरोधी पक्ष कुठे गडप झाले असा प्रश्न उठला होता. या गर्दीत कुणी सोनू सुद नामक सिने अभिनेत्याने स्वत:च्या पैशातून मजुरांची लक्झरी बसने घरवापसी केली. यामुळे राज्यांप्रमाणे केंद्र सरकारही काहीसे जनतेच्या रोषास पात्र ठरण्याची वेळ आली. महाराष्ट्रात भलतेच परप्रांतीय सत्ताबाहय शक्ती केंद्र उभे राहण्याची चिन्हे ओळखून हालचाली गतीमान झाल्या.
काहीच दिवसात परप्रांतीय मजुरांचा “मसीहा” महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समवेत भेटीस्तव आल्याची छायाचित्रे झळकली. यानंतर लगेच लडाख सिमेवर चिनी आक्रमणाचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी पंतप्रधानांनी देशाला सत्य सांगावे म्हणून कॉंग्रेस पुढे आली. पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून खुलासा केला. स्वत: लडाखने उंच शिखरावर जावून चिनला ठणकावले.
आता विस्तारवादाचे दिवस संपले असून देशाच्या सिमा वाढवण्यात वेळ वाया घालवण्याएवजी “विकासवादा”चा मार्ग धरावा अशा शब्दात मोदीजींनी चीनला ठणकावले. त्यांच्या या दणक्याने चीनच्या पोटात गोळा उठला असावा. तसा तो काही नागपुरकरांच्या पोटातही उठला असावा असे काही लोक बोलतात. खरे तर मोदीजींच्या चीन विरुद्धच्या लढ्याचे कॉंग्रेसने कौतुक करायला हवे होते.
हेच वक्तव्य अखंड हिंदुस्थानचे स्वप्न लाहोर- रावळपिंडी – कराची – इस्लामाबाद – सिंधू – झेलमसह बघणा-यांवर बुमरॅंग करायला हवे होते असे बुजुर्ग कॉंग्रेसजनांमधून बोलले जाते. तथापी कॉंग्रेसमधून तरुण नेतृत्व म्हणून राहूल गांधी किंवा प्रियंका यापैकी नेतृत्वासाठी अन्य पर्याय ठोकरले जातात असे त्यांच्या पक्षातून म्हटले जाते. राजेश पायलट, सचिन पायलट असा पर्याय उभा राहण्यापेक्षा राजस्थानचीही आहुती पडली
तरी तशी तयारी ठेवून असणा-या कॉंग्रेसमधे भाजपाच्या आक्रमक खेळीतून किमान स्पर्धकांना आऊट करुन राजस्थानवर मेहेर नजर करा अशी कॉंग्रेसची भुमिका दिसते. त्यासाठी मोदीजींच्या प्रतिमेचे मोजमाप करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षात त्यांची स्वत:ची प्रतिमा किती उंचीची दिसते याचा शोध घेणे अधिक उचित राहील. भाजपा आता राम मंदीराचा मुद्दा कृतीशील बनवण्याच्या तयारीत आहे. कोरोनाच्या गच्छंतीचा हा राममुहुर्त ठरु शकतो. त्या तुलनेत कॉंग्रेसकडे जनतेसाठी किंवा देशासाठी काय कार्यक्रम आहे? ते तरी जनतेला कळू द्या.
सुभाष वाघ (पत्रकार) जळगाव
880566 1950