गोंदिया (अनमोल पटले) : गोंदिया जिल्हा परिषद,पंचायत समिती व जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्या व दुस-या दिवशी या निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे पहिला व दुसरा दिवस निरंक गेला असून, उमेदवारांनी सुध्दा घाई न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ६ डिसेंबर, तर नगरपंचायतीसाठी ७ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. सध्या मुलाखतींचे सत्र सुरु आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण राजकारणाची दिशा ठरविण्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींची भूमिका महत्वपूर्ण असते. त्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्यादेखील अधिक असते. पक्षाकडून तिकीट मिळाले तर ठीक नाही तर अपक्ष लढू, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे, तर राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवार फायनल केले नाहीत. काँग्रेसची यादी मुंबईला गेली तर राष्ट्रवादीने मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.भाजपनेही जवळपास उमेदवारी फायनल केली परंतु बंडखोरी होणार असल्याची शक्यता लक्षात घेत त्यांनीही यादी थांबवून ठेवली आहे. त्यामुळे ही यादी दोन दिवसात फायनल होताच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नगरपरिषद क्षेत्रात नगरसेवक राहिलेले तर काही नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करणारे मतदारांनी आपले नाव जिल्हा परिषदेच्या गोंदिया तालुक्यातील विविध मतदारसंघात नोंदवले असून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच नाराजी व्यक्त करायला सुरवात केली आहे. नगरपरिषदही त्यांचीच व जिल्हापरिषदही त्यांचीच का असे म्हणू लागलेत.
बंडखाेरी टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात यादी, जागा एक अन दावेदार अनेक अशी स्थिती या निवडणुकीत आहे. त्यातच सर्वच राजकीय पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. ज्येष्ठाला डावलून कनिष्ठाला उमेदवारी दिली तर निवडणुकीत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षाचे उमेदवार आधीच जाहीर न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करुन बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून झालेला दिसतो आहे. गोंदिया तालुक्यातील एकोडी, सालेकसा तालुक्यातील कारुटोला, सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा जि.प.क्षेत्रातून विद्यमान काँग्रेस उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. मुंडीपार नव्या क्षेत्रात काँग्रेसकडून डुमेश चौरागडें,कु-हाडी निरज धमगाये, सोनी पी.जी.कटरे,शहारवाणीमधून जितेंद्र कटरेंना उमेदवारी निश्चित आहे. भाजपकडून सोनी, शहारवाणी, कुर्हाडी मतदारसंघात नवे चेहरे येणार,बोंडगावदेवीमध्ये प्रमोद पाऊलझगडे एैंवजी अरविंद शिवणकरांची वर्णी लागण्याची चर्चा सुरु आहे.