हिंगोली : कळमनुरी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत कुकर्म करणा-या आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमोल लांडगे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.व्ही.बुलबुले यांनी 17 जानेवारी रोजी सदर निकाल दिला आहे.
कळमनुरी येथील आठव्या इयत्तेत शिकणा-या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्यानंतर आरोपी अमोल लांडगे याने अत्याचार केला. याप्रकरणी 14 सप्टेबर 2019 रोजी कळमनुरी पोलीस स्टेशनला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला पोलीस उप निरीक्षक प्रतिभा शेटे यांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. ॲड. एस. डी. कुटे व ॲड. एस.एस. देशमुख यांनी या कामी सहकार्य केले.