औरंगाबाद : स्वत:चे आर्थिक उत्पन्न लपवून पत्नी व पाच वर्षाच्या मुलीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी दुर सारणा-या पतीस कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश आशिष अयाचित यांनी दोषी ठरवत पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. मुलगी तनिष्का व पत्नी पूजा अजय सोनवणे यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये दरमहा पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलीसह माहेरी राहणा-या पत्नीला दाव्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. औरंगाबाद येथील हनुमान नगर परिसरातील गुरुकृपा ज्वेलर्सचे संचालक अजय बाबूराव सोनवणे यांना हे आदेश देण्यात आले आहेत.
अजय सोनवणे यांची पत्नी पूजा ही तिच्या मुलीचा जन्म झाला तेव्हापासून माहेरी राहते. हिंदू विवाह कायदा कलम 9 प्रमाणे पुन्हा संसार करण्यासाठी अजय सोनवणे याने कौटुंबिक न्यायालयात प्रकरण सादर केले होते. पत्नी पूजाकडून पती अजयविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 9 प्रमाणे पोटगीचा दावा दाखल करण्यात आला होता. दोघा प्रकरणांची एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली.
अजय व पुजा यांचे लग्न 16 मे 2015 रोजी झाले होते. 12 सप्टेंबर 2016 रोजी या दाम्पत्याला एक मुलगी झाली. पती पत्नीचे पटत नसल्यामुळे दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी केल्या. अॅड. रमेश घोडके पाटील यांनी पत्नी पुजाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. पती अजयने खोटे पुरावे दाखल करुन न्यायालयाची फसवणूक केली. मुलीच्या जन्मापासून अजयने मुलीसह पत्नीच्या उदरनिर्वाहाची सोय केली नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील भाऊराव परळीकर विरुद्ध महाराष्ट्र शासन 2006 आणि दिलीपसिंग विरुद्ध स्टेट ऑफ यूपी 2009 या न्यायानिवाड्याचा संदर्भ घेतल्यानंतर अॅड. रमेश घोडके पाटील यांनी पुजाची बाजू मांडली. न्यायालयाने पती अजयचा दावा फेटाळून लावला. पत्नी व मुलीस प्रत्येकी दरमहा साडेसात हजार रुपये पोटगी देण्याबाबत आदेश देण्यात आला. पत्नीस जिवंत असेपर्यंत तर मुलीस सज्ञान होईपर्यंत ही रक्कम अजयने द्यायची आहे.