जळगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस जळगाव सत्र न्यायालयाने आजन्म कारावासासह दंडात्मक शिक्षा सुनावली आहे. सावळाराम भानुदास शिंदे (27) रा. मानसिंगका कॉलनी पाचोरा जि. जळगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याच्या निकालासंदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी सविस्तर माहीती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी त्यांच्या समवेत अप्पर पोलिस अधिक्षक (चाळीसगाव भाग) रमेश चोपडे, पोलिस उप अधिक्षक कैलास गावडे, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके आदी उपस्थित होते.
27/11/2021 रोजी रात्री नऊ ते रात्री दहाच्या दरम्यान आनंदवाडी चाळीसगाव येथील रहीवासी असलेल्या चार वर्षाच्या बालिकेस आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (27) रा. मानसिंगका कॉलनी पाचोरा ता. पाचोरा जि.जळगाव मुळ गाव लोंढरे ता.नांदगाव जि.नाशिक यांने बिस्कीटचा पुडा खायला देण्याचे आमिष दाखवत रेल्वे लाईनकडे नेले होते. त्याठिकाणी त्याने तिच्यावर लैंगीक अत्याचार केला होता. या घटनेप्रकरणी बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हा 28/11/2021 रोजी गु.र.नं. 437/2021 भा.द.वि. 363, 366 (अ), 376 (अ,ब), बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम कलम 3 (अ), 4, 5(म) (न), 6, 8, 9 (आय) (म) (न) व 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा प्राथमीक तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी केला. या गुन्हयात आरोपी सावळाराम शिंदे यास तात्काळ अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी या गुन्हयाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्याकडे वर्ग केला. चाळीसगाव शहर पोलीसांनी आरोपी व पिडीत मुलीचे कपडे तसेच अंगावरील सॅम्पल तात्काळ प्रयोगशाळेत पाठवुन डीएनए अहवाल प्राप्त केला. या गुन्हयाचा तपास अवघ्या सतरा दिवसात पुर्ण करुन श्रीमती एस.एन.माने – गाडेकर यांच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटला जलदगतीने चालवण्याची विनंती पोलिस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी जिल्हा सरकारी वकील केतन यांच्या मार्फत न्यायलयास केली. सदर खटला जलदगतीने चालवून साठ दिवसात सुनावणी पुर्ण करण्यात आली.
आरोपी सावळाराम भानुदास शिंदे यास आजन्म कारावास व आर्थीक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कैलास गावडे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले, पोलिस नाईक राकेश पाटील, पो.ना. राहुल सोनवणे , म.पो.हे कॉ. विमल सानप , म.पो.कॉ. सवा शेख यांनी पुर्ण केला. या खटल्याचे न्यायालयीन कामकाज जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी पाहीले. दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर साठ दिवसात निकाल लागुन आरोपीस शिक्षा झाल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.